स्टार टेनिसपटू रॉजर फेडररला यंदाच्या हंगामातील अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांना मुकावे लागणार आहे. फेडररच्या उजव्या गुडघ्यावर लवकरच एक आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे २०२० मधील उर्वरित हंगामातून त्याने माघार घेतली आहे. आता फेडरर थेट २०२१ च्या हंगामातच टेनिस कोर्टवर परत असल्याची माहिती त्याने एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

फेडररने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये एक फोटो पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अचानक त्याच्या गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यामुळे त्याला लवकरात लवकर उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणं क्रमप्राप्त आहे. २०१७ च्या हंगामात मी जे केलं, तसं आताही मला करावं लागणार आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरूस्त होऊन थेट २०२१ च्या हंगामातच मी पुन्हा टेनिस खेळण्यासाठी उतरेन, असे फेडररने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने फेडररला पराभूत केले. त्यानंतर यंदाच्या वर्षात इतर कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धांचे आयोजन झाले नाही. कारण मार्चमध्ये करोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व टेनिस सामने आणि स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. फेडररने २० ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. व्यावसायिक टेनिसच्या इतिहासात तो पुरुषांमध्ये सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालच्या नावे १९ तर ​​जोकोविचच्या नावे १७ विजेतेपदे आहेत. २०२१ च्या हंगामात फेडरर पुन्हा एकदा मैदान गाजवेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.