प्रतिबंधक उत्तेजक सेवन केल्याबद्दल दोषी ठरलेल्या रोहिणी राऊतवर पुढील कारवाईबाबत २६ एप्रिलला निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद सावंत यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत रोहिणी विजेती ठरली होती. त्या वेळी तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. तिने स्नायूंचे बळकटीसाठी उत्तेजक घेतले असल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेला कळवले आहे. ‘दाढ दुखण्यावरील उपाय म्हणून जानेवारीत आपण औषधे घेतली होती. ती बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत समाविष्ट असल्याचे मला माहीत नव्हते,’ असा खुलासा रोहिणीने केला.
राज्य संघटनेची २६ एप्रिलला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये रोहिणी व तिचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर तिच्यावर कोणती कारवाई करावयाची याबाबत निर्णय होणार आहे. रोहिणीने आशियाई कनिष्ठ गट स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तसेच तिने अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मैदानी स्पर्धामध्ये भरघोस पदके मिळविली आहेत.