भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ३ डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात रंगणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. पण टी २० विश्वचषक स्पर्धेबाबत अंतिम निर्णय झाल्यावरच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत निश्चित सांगता येईल, असे BCCI कडून सांगण्यात आले आहे. पण ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडू मात्र या मालिकेसाठी उत्सुक आहेत. या दौऱ्यावर प्रत्येक भारतीय खेळाडूच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पण विशेष लक्ष कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियात प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माकडे असेल असे बोलले जात आहे.

रोहितने भारतात झालेल्या कसोटी मालिकेत सलामीला खेळताना दमदार कामगिरी केली. आफ्रिकन गोलंदाजांना त्याने चांगलाच चोप दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्या गाजवण्याचीदेखील रोहितमध्ये क्षमता असल्याचे मत एका ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूने व्यक्त केले आहे. “जगातील कोणत्याही फलंदाजाची कसोटी लागेल असा ऑस्ट्रेलिया दौरा असतो. पण मला असं वाटतं की रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून बराच काळ फलंदाजी केली आहे आणि आता कसोटी क्रिकेटमध्येही त्याला हळूहळू यश मिळू लागले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असणार यात वाद नाही. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्याची क्षमता आणि कौशल्य दोन्ही त्याच्याकडे आहे”, असा विश्वास डावखुरा माजी फलंदाज माइक हसी याने व्यक्त केला.

“ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यासमोर सलामीला फलंदाजी करणं आव्हानात्मक असतं हे मला माहिती आहे, पण मला असं वाटतं की तो परिस्थितीशी नक्कीच जुळवून घेईल आणि चांगली कामगिरी करेल”, असेही हसी म्हणाला.

 

बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अ‍ॅडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)