भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने सर्व परिचारिकांचे आभार मानले आहेत. सध्या देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दरदिवशी तीन लाखांहून अधिक करोनाची प्रकरणे समोर येत आहेत. या संकटसमयी रुग्णालयात परिचारिका आपले सर्वस्व पणाला लावून रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्साठी सचिनने एक ट्विट केले.

सचिन म्हणाला, “परिचारिका शांतपणे मानवतेची सेवा करीत आहेत. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्यासाठी त्या रात्री जागतात. त्यांना आपली काळजी असते. या साथीच्या रोगात, आपल्याला त्यांचे जास्त महत्त्व कळले. तुम्ही आमच्यासाठी जे केले त्याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा.”

 

 

या ट्विटसह सचिनने मिझोरम आणि त्रिपुरा सीमेवर आसामच्या दुर्गम भागात असलेल्या माकुंदा रुग्णालयात गरजूंची सेवा करणार्‍या तीन परिचारिकांचे फोटो पोस्ट केले. २७ मार्चला सचिनला करोनाचे निदान झाले. त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. ८ एप्रिल रोजी तो घरी परतला. सचिनने देशभरातील करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली असून प्लाझ्मा देण्याचेही आश्वासन दिले आहे.

इंग्लंडच्या समाजसेविका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिक दिन साजरा केला जातो.