बीडब्लूएफ जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत हे भारतातील अव्वल बॅडमिंटनपटू बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्लूएफ जागतिक सुपर सीरिज अंतिम स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळालेली सायना आणि इंडोनेशियन मास्टर्स स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा किदम्बी आत्मविश्वासाने या स्पध्रेतील आव्हानांचा सामना करणार आहेत.
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाला गत महिन्यात चायना सुपर सीरिज प्रीमिअर स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुखापतीतून सावरण्यासाठी तिने विश्रांतीचा निर्णय घेतला. त्यामुळे हाँगकाँग खुल्या स्पध्रेतून तिला माघार घ्यावी लागली. पुरेशा विश्रांतीनंतर कोर्टवर दाखल होणाऱ्या सायनाला ‘अ’ गटातील पहिल्या लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहाराच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ‘‘अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मी सर्वोत्तम खेळ करीन,’’ असे सायनाने सांगितले.
दरम्यान, यंदाचा हंगाम हे श्रीकांतसाठी चढउतारांचे होते. यंदाच्या सत्रात त्याने स्वीस खुली स्पध्रेत आणि इंडियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले. त्यानंतर त्याला अनेक स्पर्धामध्ये सुरुवातीच्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मात्र गत आठवडय़ात पार पडलेल्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेत त्याने उपविजेतेपद पटकावून पुन्हा आत्मविश्वास कमावला आहे. याच आत्मविश्वासाने तो पहिल्या फेरीत जपानच्या केंटो मोमोटाचा सामना करणार आहे. ‘‘या हंगामाचे दुसरे सत्र अवघड होते. आशा करतो की, या वर्षअखेरच्या स्पध्रेत चांगली कामगिरी करण्यात यश मिळेल,’’ असे श्रीकांत म्हणाला.