सिंधू, साईप्रणीतची विजयी सलामी

 चँगझोऊ (चीन) : लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालचे चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीतने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबॅमरुंगफानने ४४ मिनिटांत सायनाला २१-१०, २१-१७ असे नामोहरम केले. जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील सायनाने थायलंडच्या बुसाननकडून सलग दुसऱ्यांदा हार पत्करली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर २९ वर्षीय सायनाने हंगामाचा प्रारंभ इंडोनेशिया खुली स्पर्धा जिंकून दिमाखात केला; परंतु कामगिरीत सातत्य राखण्यात ती अपयशी ठरत आहे.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने लि शुएरुईचा ३४ मिनिटांत २१-१८, २१-१२ असा पाडाव केला. या विजयासह सिंधूने जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या शुएरुईविरुद्धची जय-पराजयाची कामगिरी आता ३-३ अशी राखली आहे. पुरुष एकेरीत बी. साईप्रणीतने थायलंडच्या सुप्पानयू अविहिंगसॅनॉनला २१-१९, २१-२३, २१-१४ असे पराभूत केले.

* मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात आले. जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि इसाबेल हेर्टरिच जोडीने प्रणव-सिक्की जोडीला २१-१२, २३-२१ असे पराभूत केले.

* महिला दुहेरी अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना पुढे चाल देण्यात आली. चायनीज तैपेईच्या चेंग चि या आणि लि चि चेन जोडीविरुद्धच्या जोडीने सामना अर्धवट सोडला. यावेळी अश्विनी-सिक्की जोडी २१-१३, ११-८ अशा फरकाने आघाडीवर होती.

* पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी जोडीचा पराभव झाला. इंडोनेशियाच्या एहसान मोहम्मद आणि सेटियावान हेंड्रा जोडीने मनू-सुमितला २१-१५, २१-१५ असे पराभूत केले.