* सय्यद मोदी चषक ग्रां. प्रि. बॅडिमटन स्पर्धा
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालचा जेतेपदांचा दुष्काळ अखेर वर्षभरानंतर संपला. भारताची युवा खेळाडू पी. व्ही. सिंधू हिच्यावर सहजपणे मात करत सायनाने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां. प्रि. स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. राष्ट्रीय विजेत्या के. श्रीकांत याला मात्र अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
अव्वल मानांकित सायनाने सिंधूचा २१-१४, २१-१७ असा पराभव केला. श्रीकांतला चीनच्या झू साँग याच्याकडून २१-१६, १९-२१, १३-२१ अशी हार पत्करावी लागली. महिला दुहेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीवर चीनच्या खेळाडूंचेच वर्चस्व राहिले.
सायना आणि सिंधू या देशातील दोन अव्वल खेळाडूंमध्ये रंगणाऱ्या लढतीकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सायना आणि सिंधू प्रथमच एकमेकींसमोर आल्या होत्या. अखेर ४० मिनिटं रंगलेल्या या लढतीत सायनाने बाजी मारली. सायनाने आक्रमक खेळ करत सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली. सिंधूने तिला झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण सायनाला गाठणे तिला जमले नाही. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आपल्या उंचीचा फायदा उचलत सायनाचे फटके सहज परतवून लावले. ९-९ अशा बरोबरीनंतर सायनाने खेळ उंचावत विजेतेपदावर मोहोर उमटवली.