जकार्ता : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी तिने इंडोनेशियाच्या दिनार डय़ा आयुस्टिन हिचे आव्हान मोडीत काढत आगेकूच केली आहे. बी. साईप्रणीथ आणि शुभंकर डे यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सलामीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.

पहिला गेम गमवावा लागला तरी आठव्या मानांकित सायनाने आयुस्टिन हिचे आव्हान ७-२१, २१-१६, २१-११ असे परतवून लावले. सायनाचा हा आयुस्टिनवरील तिसरा विजय ठरला. सायनाला आता दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या फिट्रियानी फिट्रियानी हिच्याशी लढत द्यावी लागेल. सायनाने फिट्रियानीविरुद्धचे याआधीचे चारही सामने जिंकले आहेत.

पुरुष एकेरीत, सिंगापूर स्पर्धा जिंकणाऱ्या साईप्रणीथला चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँग याच्याकडून १२-२१, १६-२१ असा गाशा गुंडाळावा लागला. शुभंकर डे याने माजी जगज्जतेच्या विक्टर अ‍ॅक्सेलसेन याला कडवी लढत दिली. अखेर त्याचे आव्हान १४-२१, २१-१९, १५-२१ असे संपुष्टात आले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला थायलंडच्या जोंगकोलफान कितीथाराकुल आणि रवींदा प्रजोंगपाय या जोडीकडून १४-२१, १४-२१ अशी हार पत्करावी लागली. राष्ट्रीय विजेत्या मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या जोडीला डेन्मार्कच्या मॅड्स पायलर कोल्डिंग आणि निकोलस नोहर यांनी १४-२१, २१-१९, २१-१५ असे पराभूत केले.