भारत सरकारने जागतिक दर्जाचे पुनर्वसन केंद्र बनवायला हवे. या केंद्राचा चांगला फायदा खेळाडूंना होईल, असे मत भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगने व्यक्त केले आहे.

संदीप चांगल्या फॉर्मात असताना २००६ साली दिल्ली-काल्का शताब्दी एक्स्प्रेसमधून तो प्रवास करीत होता. या एक्स्प्रेसला अपघात झाला आणि त्यामध्ये संदीपला गंभीर दुखापत झाली होती. ज्या वेळी संदीपला अपघात झाला तेव्हा भारतीय संघ एका स्पर्धेसाठी जर्मनीला रवाना होणार होता.

‘‘माझ्या बाबतीत जे घडले आहे ते अन्य खेळाडूंबरोबर घडू नये, असे मला वाटते. दुखापतीतून खेळाडूंना लवकर सावरता यावे आणि त्यांनी देशाची सेवा करावी यासाठी भारतीय सरकारने जागतिक दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारायला हवे. आपले क्रीडामंत्री हे एक खेळाडू होते, त्यामुळे त्यांना याबाबत लक्ष घालावे,’’ असे संदीपने सांगितले.

भारताकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम संदीपच्या नावावर आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा आणि विनंतीचा सरकारने विचार करायला हवा.

‘‘भारत सरकार खेळावर मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च करते. पण एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला भारतात सर्व उपचार करता येतातच असे नाही. पुनर्वसनासाठी खेळाडूंना परदेशात जावे लागले. बीसीसीआयने बंगळूरूमध्ये जागतिक दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारले आहे, त्याचा आदर्श भारत सरकार घेऊ शकते,’’ असे संदीप म्हणाला.