सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सोमवारी रौप्यपदक जिंकताना आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील भारताची यशोपताका फडकवत ठेवली आहे.

१७ वर्षीय विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने २४४.५ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. उत्तर कोरियाच्या किम संग गुकने २४६.५ गुण मिळवत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. इराणच्या फोरॉघी जावेदने   (२२१.८ गुण) कांस्यपदक प्राप्त केले.

लुसेल नेमबाजी संकुलात चालू असलेल्या या स्पर्धेत सौरभ आणि अभिषेक वर्मा प्रत्येकी ५८३ गुणांसह अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. आठ जणांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अभिषेकने १८१.५ गुण मिळवल्याने पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याआधीच्या स्पर्धामध्येच सौरभ आणि अभिषेक यांनी ऑलिम्पिकमधील स्थानांची निश्चिती केली आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारत आणि चीन यांनी दोन स्थानांची आधीच निश्चिती केल्याने इराण, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांना ऑलिम्पिक स्थाने देण्यात आली.