उद्यापासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरूवात होत आहे. पण, त्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळावर (CSA) चांगलाच संतापलाय. त्याने सीएसएवर जोरदार टीका केली आहे. सीएसएने पाकिस्तानविरोधात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू असतानाच आपल्या काही स्टार खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली, त्यावरुन आफ्रिदी भडकला आहे.

यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात बुधवारी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डि कॉक आणि वेगवान गोलंदाज कगीसो रबाडा यांच्या अनुपस्थित उतरला होता. हा सामना 28 धावांनी जिंकून पाकिस्तानने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका 2-1 अशी जिंकली. पाकिस्तानने दिलेल्या 321 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 3 चेंडू शिल्लक असताना 292 धावांवर सर्वबाद झाला. सामना संपल्यानंतर आफ्रिदीने ट्विटरद्वारे संतप्त प्रतिक्रिया दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर टी-20 लीगचा परिणाम होतोय हे पाहून वाईट वाटतं… दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने मालिका अर्धवट सोडून खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली याचं आश्चर्य वाटतंय… याबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे अशा शब्दात आफ्रिदीने आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला सुनावलं आहे.


दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला आहे. आता १० एप्रिलपासून दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.