ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर रोहित शर्मा आशावादी

चेन्नई : पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सलामीवीर शिखर धवनला सूर गवसणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा प्रभारी कर्णधार व धवनचा सलामीचा सहकारी रोहित शर्माने व्यक्त केली.

२०१६च्या टे्वन्टी-२० विश्वचषक विजेत्या विंडीजला भारताने रविवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात सहा गडी राखून पराभूत करून मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. या सामन्यात धवनने ९२ धावांची खेळी साकारत संपूर्ण दौऱ्यावरील पहिले अर्धशतक झळकावले. रोहित व लोकेश राहुल लवकर परतल्यावर धवन आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८० चेंडूंत १३० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली.

धवनच्या या खेळीविषयी रोहित म्हणाला, ‘‘संघाच्या आणि खेळाडूच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी सूर गवसणे अतिशय अनुकूल आहे. एकदिवसीय मालिकेतही धवन चांगली फलंदाज करत होता, मात्र उत्तम सुरुवातीचे त्याला मोठय़ा खेळीत रूपांतर करणे जमले नाही. तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत त्याने सामना जिंकवून देणारी खेळी केल्यामुळे मला फार आनंद झाला आहे.’’

‘‘पंतलादेखील धावांची भूक भागवण्यासाठी धडाकेबाज फलंदाजी करायची होती. परिस्थितीही त्याच्या खेळीला साजेशी असल्याने पंतने दडपण न बाळगता आपला नैसर्गिक खेळ केला. दोन्ही फलंदाजांची बॅट ऐन मोक्याच्या क्षणी तळपली, हे संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,’’ असे रोहित म्हणाला. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून ब्रिस्बेन येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला जाणार आहे.

‘‘विंडीजविरुद्धच्या मालिका विजयातून प्रेरणा घेत संघाने ऑस्ट्रेलियात खेळ करावा. तेथील खेळपट्टय़ांवर सुरेख कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असले, तरी ते तितकेच आव्हानात्मकदेखील आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौरा खेळाडू व संघ म्हणून तुमची कसोटी पाहणारा ठरेल,’’ असे रोहितने सांगितले.

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला वगळण्यात आल्याच्या निर्णयाविषयी विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘मार्च महिन्यात श्रीलंकेत झालेल्या निदाहास करंडक क्रिकेट स्पर्धेतही धोनी संघात नव्हता. मात्र त्याची कमतरता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नक्कीच जाणवेल. त्याच्या फक्त संघात असण्याने माझ्याच नव्हे, तर अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा व आत्मविश्वास प्राप्त होतो.’’

याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पंडय़ाचे कौतुक करत भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी प्रगती करण्यासाठी अशा प्रकारच्या बेधडक अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे, असे रोहितने नमूद केले.