युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि कदम्बी श्रीकांत यांनी आपापले सामने जिंकत ७८व्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. महिलांच्या एकेरीत रितूपर्णा दास हिच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत सिंधूने दुसऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपदाची कमाई केली.
थायलंड ग्रां. प्रि. सुवर्णचषक स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतने ४० मिनिटे रंगलेल्या सामन्यात आरएमव्ही गुरुसाईदत्त याचा २१-१३, २२-२० असा पराभव केला. त्याचे हे पहिले राष्ट्रीय जेतेपद ठरले. दुसऱ्या मानांकित सिंधूने रितूपर्णावर २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. अपर्णा बालन आणि अरुण विष्णू यांनी के. तरुण आणि अश्विनी पोनप्पा यांच्यावर २१-१०, २१-१७ अशी मात करत मिश्र दुहेरीतील जेतेपद कायम राखले. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने २००९नंतर पहिल्यांदाच महिला दुहेरीचे जेतेपद प्राप्त केले. ज्वाल-अश्विनी जोडीने प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर यांनी मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी २१-१९, २१-१७ असा पाडाव करत बाजी मारली.