थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून सलग दोन सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे या वर्षांतील पहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी सिंधूची विजेतेपदाची कोंडी फुटणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विश्रांतीनंतर कोर्टवर दमदार पुनरागमन करणाऱ्या सिंधूने इंडोनेशिया स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारूनही तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर गेल्या आठवडय़ात जपान खुल्या स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. दोन्ही वेळेस यामागुचीने सिंधूच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते. त्यामुळे सात महिन्यांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य सिंधूने बाळगले आहे. महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात चौथ्या मानांकित सिंधूला चीनच्या बिगरमानांकित हान यूए हिचा सामना करावा लागेल. उपांत्यपूर्व फेरीत मजल मारल्यास, सिंधूसमोर थायलंडच्या सहाव्या मानांकित रत्चानोक इन्थनॉन हिचे आव्हान असेल.

सायना नेहवाल हिला या स्पर्धेसाठी सातवे मानांकन मिळाले होते. मात्र दुखापतीमुळे तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी सायना सज्ज होत आहे. पुरुष एकेरीत शुभंकर डे याचा सलामीचा सामना जपानच्या अव्वल मानांकित केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे. बी. साईप्रणीतला थायलंडच्या कान्टाफोन वँगचारेओन याच्याशी पहिली लढत द्यावी लागेल. एच. एस. प्रणॉय याला सलामीच्या सामन्यात हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंट याच्याशी तर समीर वर्माला मलेशियाच्या ली झि जिया तसेच पारुपल्ली कश्यपला फ्रान्सच्या ब्रायस लेवेर्डेझ याच्याशी दोन हात करावे लागतील.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची लढत भारताच्याच मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या जोडीशी होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचा सामना चीनच्या ली वेन मेई आणि झेंय यू यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी हे सलामीच्या सामन्यात जपानच्या कोहेय गोंडो आणि आयाने कुरीहारा एकमेकांसमोर असतील. अश्विनी-सात्विक यांना मलेशियाच्या पाचव्या मानांकित चेन पेंग सून आणि गोह लिऊ यिंग यांच्याविरुद्ध खेळावे लागेल.