कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मोहालीच्या मैदानावरील या विजयामुळे भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विराटने या सामन्यात नाबाद ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेकडून १५० धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने विजयी लक्ष्याच्या दिशेने यशस्वी आगेकूच केली.

शिखर धवन ४० धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार क्विंटन डी-कॉक आणि टेंबा बावुमाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात १४९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या क्विंटन डी-कॉकने अर्धशतकी खेळी करत आफ्रिकेला आश्वासक धावसंख्या गाठून देण्यात मदत केली.

रेझा हेंड्रिग्ज आणि क्विंटन डी-कॉक जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये सावध खेळ करत आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. हेंड्रिग्ज चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर डी-कॉकने बावुमाच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान डी-कॉकने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावा केल्या. मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर तो नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर रविंद्र जाडेजाने वॅन डर डसेनला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद करत माघारी धाडलं. यानंतर टेंबा बावुमा आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत आफ्रिकेला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. तो ४९ धावा करुन दिपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. अखेरच्या षटकांमध्ये धीम्या गतीचे चेंडू टाकत भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. या जोरावर आफ्रिकेला १४९ धावांवर रोखण्यात भारताला यश मिळालं. भारताकडून दिपक चहरने २, रविंद्र जाडेजा-नवदीप सैनी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

22:21 (IST)18 Sep 2019
श्रेयस अय्यरचा विजयी चौकार, भारत सामन्यात विजयी

७ गडी राखून आफ्रिकेवर केली मात, भारत मालिकेत १-० ने आघाडीवर

22:08 (IST)18 Sep 2019
कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, भारत विजयाच्या समीप

आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत कोहलीचं अर्धशतक

21:59 (IST)18 Sep 2019
ऋषभ पंत पु्न्हा अपयशी, अवघ्या ४ धावा काढून माघारी

फिरकीपटू फॉर्च्युनच्या गोलंदाजीवर शम्सीकडे झेल देत पंत माघारी परतला

21:50 (IST)18 Sep 2019
शिखर धवन-विराट कोहलीची जमलेली जोडी आफ्रिकेने फोडली

तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर फटका खेळताना सीमारेषेवर डेव्हिड मिलरने घेतला शिखर धवनचा झेल

21:11 (IST)18 Sep 2019
आश्वासक सुरुवातीनंतर भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत  होऊन बाद

20:39 (IST)18 Sep 2019
आफ्रिकेची १४९ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी १५० धावांचं आव्हान

20:27 (IST)18 Sep 2019
डेव्हिड मिलर त्रिफळाचीत, आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी

हार्दिक पांड्याने घेतला मिलरचा बळी

20:25 (IST)18 Sep 2019
टेंबा बावुमाचं अर्धशतक एका धावाने हुकलं, आफ्रिकेला चौथा धक्का

दिपक चहरच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने घेतला झेल

19:57 (IST)18 Sep 2019
भारताचं दमदार पुनरागमन, वॅन डर डसेन माघारी

रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर घेतला डसेनचा झेल, आफ्रिकेला तिसरा धक्का

19:52 (IST)18 Sep 2019
आफ्रिकेला दुसरा धक्का, क्विंटन डी-कॉक माघारी

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर सरळ उंच फटका खेळण्याचा डी-कॉकचा प्रयत्न फसला. कर्णधार विराट कोहलीने प्रसंगावधान दाखवत अखेरच्या क्षणांमध्ये उडी मारत झेल पकडला. ५२ धावांची खेळी करुन डी-कॉक माघारी

19:50 (IST)18 Sep 2019
कर्णधार क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक

क्विंटन डी-कॉकने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावलं आहे. आफ्रिकेची आश्वासक धावसंख्येकडे वाटचाल...

19:20 (IST)18 Sep 2019
आश्वासक सुरुवातीनंतर आफ्रिकेची सलामीची जोडी फोडण्यात भारताला यश, हेंड्रिग्ज माघारी

क्विंटन डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आश्वासक सुरुवात करत भारतीय गोलंदाजांना चांगलं आव्हान दिलं. मात्र दिपक चहरच्या गोलंदाजीवर हेंड्रिग्जचा अंदाज चुकला, चेंडू बॅटची कड घेऊन मिड ऑनच्या जागेवर उभ्या असलेल्या वॉशिंग्टन सुंदरच्या हातात.

आफ्रिकेचा पहिला गडी माघारी

18:40 (IST)18 Sep 2019
असा असेल दक्षिण आफ्रिकेचा अंतिम ११ जणांचा संघ...
18:40 (IST)18 Sep 2019
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ
18:39 (IST)18 Sep 2019
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय