दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक वन-डे सामन्यांच्या स्पर्धेत शेन डॅडस्वेल या फलंदाजाने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. नॉर्थ-वेस्ट युनिव्हर्सिटीच्या संघाकडून खेळताना शेन डॅडस्वेलने तब्बल १५१ चेंडुंमध्ये ४९० धावांचा रतीब घातला. पोच ड्रॉप क्रिकेट क्लब संघाविरुद्ध खेळताना डॅडस्वेलने ही अविश्वसनीय खेळी केली आहे. शनिवारी घडलेल्या सामन्यात डॅडस्वेलने अक्षरशः मैदानात चौफेर फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. आपल्या २० व्या वाढदिवशी खेळताना डॅडस्वेलने केलेली ही खेळी त्याच्यासाठी कायम संस्मरणीय ठरणार आहे. ५०० धावांचा टप्पा पार करण्यासाठी केवळ १० धावांची गरज असताना डॅडस्वेल झेलबाद होऊन माघारी परतला. आपल्या ४९० धावांच्या खेळीत डॅडस्वेलने तब्बल २७ चौकार आणि ५७ षटकार लगावले. याचाच अर्थ डॅडस्वेलच्या ४९० धावांपैकी ४५० धावा या केवळ चौकार आणि षटकारांमधून आलेल्या आहेत.

मात्र, ४९० धावांची खेळी करुनही शेन डॅडस्वेलचा हा पराक्रम विक्रमांच्या यादीत समाविष्ट केला जाणार नाहीये. कारण शेन खेळत असलेल्या सामन्याला दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये ‘अ’ दर्जाची श्रेणी नाहीये. कोणत्याही देशातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आयसीसी ‘अ’ दर्जाची श्रेणी देते. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये केलेली कामगिरी किंवा विक्रम ग्राह्य धरले जातात. याआधीही डॅडस्वेलच्या नॉर्थ-वेस्ट युनिव्हर्सिटीच्या संघाने रेडबुल कॅम्पस क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

डॅडस्वेलच्या ४९० धावांच्या खेळीच्या जोरावर, युनिव्हर्सिटीच्या संघाने ५० षटकांत ६७७/३ अशी मजल मारली. डॅडस्वेलव्यतिरीक्त रुआन हसब्रोक या खेळाडूनेही ५२ चेंडुत १०४ धावांची खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. युनिव्हर्सिटीच्या संघाने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना पोच ड्रॉपचा संघ २९० धावांपर्यंत मजल मारु शकला. अखेर युनिव्हर्सिटीच्या संघाने हा सामना ३८७ धावांनी जिंकला. याआधी भारतामध्येही अशाच स्वरुपाची खेळी काही खेळाडूंनी केली होती. दिल्लीच्या मोहीत अग्रवालने स्थानिक सामन्यात खेळताना ७२ चेंडुंमध्ये ३०० धावांची खेळी केली. तर कल्याणच्या प्रणव धनावडेने स्थानिक शालेय क्रिकेट सामन्यात खेळताना ३२३ चेंडुंमध्ये १००९ धावांची खेळी केली होती.