बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी बंगळुरूत बैठक शरद पवारांनाही साकडे
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी एन. श्रीनिवासन गटाकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयची सूत्रे हाती ठेवण्याची रणनीती आखण्याकरता श्रीनिवासन गटाची गुरुवारी बंगळुरू येथे बैठक होणार आहे.
बोर्डाशी संलग्न असलेल्या जवळपास ८ ते ९ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असून पूर्व विभागातून अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी अमिताभ चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौधरी हे श्रीनिवासन यांच्या विश्वासातील व्यक्ती आहेत. ‘‘ बंगळुरूच्या बैठकीत आम्ही प्रतिनिधी पाठवला आहे. तसेच या बैठकीत बीसीसीआयबाबत काय निर्णय होतो, हे जाणून घेण्यासाठी मीही जातीने हजर राहणार आहे,’’ अशी माहिती पूर्व विभागातील एका राज्य संघटनेचे सदस्य आणि श्रीनिवासन यांचे निष्ठावानांपैकी एकाने सांगितले.
या बैठकीत अमिताभ चौधरी यांना अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार असले तरी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) दालमिया यांची शोकसभा होईपर्यंत कोणत्याही बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हेही पूर्व विभागाच्या संघटनांशी मागच्या दाराने चर्चा करत आहेत. आपल्याबद्दल संघटनांचे काय मत आहे,याची चाचपणी ठाकूर करत आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे राजीव शुक्ला यांचे. मात्र, त्यांनी या मुद्यावर कोणतेही भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या घडीला काय होईल हे मी कसा सांगू शकतो? याविषयी कोणतेही भाष्य करायचे नाही,’’ अशी प्रतिक्रिया शुक्ला यांनी दिली.

पवारांची भेट : बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एन. श्रीनिवासन यांनी नागपुरात शरद पवारांची भेट घेतली. आयसीसीचे आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या पवारांना भेटण्यासाठी श्रीनिवासन विशेष विमामाने नागपुरात दाखल झाले. बीसीसीआयमध्ये पुन्हा सक्रिय होण्यासाठी श्रीनिवासन आतूर आहेत.