मुलींमध्ये मुंबईची बाजी; मुलांमध्ये यशराज खाडे मालिकावीर

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नाशिकमध्ये १७ वर्षांआतील  मुलांच्या आणि मुलींच्या महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या संघाने बलाढय मुंबईचा पराभव करून या महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

मुलांच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या यशराज खाडेने आपल्या आधीच्या दोन  सामन्यातील कामगिरीप्रमाणेच या अंतिम सामन्यातही बहारदार खेळी केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी  करतांना २० षटकांत ११९ धावा केल्या. यामध्ये नाशिकच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. यामध्ये काव्य चव्हाणने आपल्या चार षटकात १३ धावांच्या बदल्यात दोन बळी मिळविले, तर रितेश  तिडकेने १५ धावत दोन बळी आणि यशराज खाडे ने आपल्या चार षटकात दोन बळी मिळवत मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळविले. या धावांचा पाठलाग करतांना नाशिकच्या यशराज खाडेने ४४ चेंडूत ५५ धावांची बहारदार खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, तर नाशिकच्या रितेश तिडकेनेही सुंदर फलंदाजी करून २७ धावा करून आपल्या संघाच्या विजयात चांगला हातभार लावला.

नाशिकच्या यशराज  खाडेच्या या अष्टपैलू खेळीमुळे त्याला सामनावीरचा किताब मिळाला तर या संपूर्ण स्पर्धेतही यशराजने प्रत्येक सामन्यात फलंदाजीबरोबरच आपल्या गोलंदाजीतही चांगली कामगिरी करून या स्पर्धेत मानाचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताबही आपल्या नावे केला. मुलींमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करून कोल्हापुरवर मात करून विजेतेपद मिळविले. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी  करतांना १०० धावांची खेळी केली,  क्षेत्र रक्षण करतांना  चांगली गोलंदाजी करून कोल्हापूरच्या संघाला ७१ धावांवर रोखून आपल्या संघाला विजयी केले. स्पर्धेत पुणे संघाने मुलामध्ये आणि मुलींमध्येही तिसरा क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र शासनाचे शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अप्पर  सचिव किरण संख्ये यांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख  पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे, सहसचिव योगेश हिरे, या स्पर्धाचे आयोजक  जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुलांच्या संघात मुंबई विभाग उपविजेता संघ ठरला तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या संघात मुंबई विजेता तर कोल्हापूर संघ उपविजेता ठरला. पुणे विभाग तिसऱ्या विभागावर राहिला. मुंबईची सारा मोहमंद सामनावीर ठरली तर मालिकावीरचा बहुमान कोल्हापुर संघाच्या सोम्यालात बिराजदार हिने पटकावला.