सुलक्षण कुलकर्णी ; मुंबईचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक

रणजी म्हणजे माझा जीव की प्राण. शाळा संपल्यावर मी रणजी स्पर्धा पाहायला जायचो. मुंबईच्या खेळाडूंना पाहून प्रभावित व्हायचो. या खेळाडूंबरोबर, या स्टेडियममध्ये मला खेळायला मिळेल का? हे प्रश्न पडायचे. कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवले. ज्या खेळाडूंना पाहून प्रभावित झालो त्यांच्यासोबत खेळायला मिळाले. सुनील गावस्कर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंबरोबर खेळायला मिळाले. मुंबईच्या ड्रेसिंग रूमचा एक भाग होता आले. रथी-महारथी खेळाडूंबरोबर संवाद साधता आला, शिकता आले. रणजी विजेत्या संघाचा आपण एक भाग असू शकतो का, हे स्वप्न पाहिले, तेही पूर्ण झाले. मुंबईचा प्रशिक्षक होणे आणि माझ्या कारकीर्दीत संघाने जेतेपद पटकावले. जेतेपद पटकावताना सचिन तेंडुलकर सर्व सामने खेळला. सचिनच्या पहिल्या रणजी सामन्यात मी त्याचा सहकारी होतो आणि त्याच्या अखेरच्या सामन्यात मी त्याचा प्रशिक्षक होतो. सचिन तेंडुलकरचे एक वाक्य आहे, ‘‘स्वप्नांचा पाठलाग करा, ती पूर्ण होतात,’’ याचा प्रत्यय मला आला. माझ्या कारकीर्दीतील एक किस्सा सांगतो, जो या पिढीला नक्कीच माहिती नसेल. मुंबईला रणजी जिंकण्याची सवय आहे. जेव्हा दोन वर्षे मुंबई जिंकत नाही तेव्हा सारेच सैरभैर होतात; पण जेव्हा मुंबईचा संघ दहा वर्षे जिंकला नाही, तेव्हा काय झाले असेल, याचा विचारही करता येणार नाही. यापूर्वी हे कधीच झाले नव्हते. १९८४-१९९४ या दहा वर्षांत मुंबई रणजी स्पर्धा जिंकली नव्हती. त्या वेळी मी खेळत होतो. त्या वेळी मुंबईच्या खेळाडूंची काय मन:स्थिती असेल? पण १९९४ साली रवी शास्त्रीच्या नेतृत्वाखाली बंगालला अंतिम फेरीत नमवत आम्ही जेतेपद पटकावले. माझ्या कारकीर्दीतले ते पहिले रणजी जेतेपद. हे जेतेपद अवीट आनंद देणारे होते. त्या वेळी सचिन, संजय, विनोद आणि सलील अंकोला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी जिंकलेले हे जेतेपद अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असेच. त्यानंतरच्या वर्षी सचिनच्या नेतृत्वाखाली जिंकलो. दिवस-रात्र रणजी स्पर्धेची अंतिम फेरीही आम्ही जिंकली. ऑस्ट्रेलियाला ब्रेबॉर्न स्टेडियमवर पराभूत केले त्या संघातही मी होतो. त्या वेळी प्रत्येक वेळी आम्ही इराणी करंडक जिंकलो. माझा शेवटचा इराणी करंडक आम्ही जिंकलो; पण त्यानंतर २० वर्षांत मुंबईला इराणी करंडक जिंकता आला नाही. मुंबईमध्ये खडूसपणा आला तो माजी क्रिकेटपटूंचा खेळ पाहूनच. मुंबईची शालेय, महाविद्यालयीन, क्लब, आंतरकार्यालयीन सामने असो, या साऱ्या सामन्यांमध्ये खडूसपणा दिसतो. तो मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या रक्तात भिनला गेलेला आहे. हा खडूसपणा सांगून येत नाही. स्पर्धात्मक क्रिकेटमुळेच तो आला. ‘छोडने का नहीं’ हे मुंबईचे नेहमीचे ब्रीदवाक्य. एक किस्सा सांगतो. दिल्ली, महाराष्ट्रसारख्या संघांबरोबर खेळताना अधिक चेव चढायचा. खडूसपणामध्ये कट्टरपणा यायचा. काहीही झाले तरी या संघांशी हरायचे नाही, हे मनात पक्के असायचे. १९९४ साली रवीच्या नेतृत्वाखाली आम्ही जेतेपद पटकावले. त्या वेळी उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा संघ समोर होता. आमची ७ बाद ३२५ अशी स्थिती होती. मी सहाव्या क्रमांकावर खेळायला गेलो. चहापानाला पॅव्हेलियनमध्ये आलो तेव्हा ५ धावांवर खेळत होतो. त्या वेळी रवी म्हणाला, ‘‘सुलू, पाचसों लगाने का बोर्ड पे! बोल्लो कितना?’’ तो म्हणाला. ‘‘५००. कोशिश करता हूं.’’ एवढेच त्याला उत्तर दिले. कुणाला विश्वास बसणार नाही, आम्ही ५०४ धावा केल्या. मी तळाच्या फलंदाजांना घेऊन १४० धावा केल्या. पॅव्हेलियनमध्ये आल्यावर रवी म्हणाला, ‘‘बोला था ना तेरे को, करेंगें करके, चल अब फायनल का सोचते हैं.’’ याला म्हणतात खडूसपणा.