T20 World Cup 2020 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० विश्वचषक २०२० क्रिकेट स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड असे ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचले. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. ब गटातील अंतिम गुणतक्ता आजच्या आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर स्पष्ट झाला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेला ७ गुणांसह ब गटातील अव्वल स्थान मिळाले. तर इंग्लंडला ६ गुणांसह दुसरे स्थान मिळाले. त्यामुळे आता उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे तर आफ्रिकेचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.

भारतीय संघाने टी २० विश्वचषक स्पर्धेतील चारही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. अटीतटीच्या सामन्यात दिप्ती शर्माने नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर पूनम यादवने मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाचे चार बळी टिपत भारताला १७ धावांनी विजय मिळवून दिला. दुसरा सामनादेखील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. शफालीची दणकेबाज खेळी आणि गोलंदाजी शिस्तबद्धचा याच्या बळावर भारताने १८ धावांनी विजय मिळवला.

भारताचा तिसरा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी रंगला. या सामन्यात भारताकडून शफाली वर्माने ४६ धावा केल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि भारताने सामना ३ धावांनी जिंकत आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. त्यानंतर औपचारिकता म्हणून खेळण्यात आलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताला आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. या सामन्यातही शफालीने ४७ धावांची दमदार खेळी केली आणि भारताला साखळी फेरीत अजिंक्य ठेवले.