2019 वर्षाची सुरुवात भारतीय संघासाठी अतिशय चांगली झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 च्या फरकाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर आनंदाचा वर्षाव सुरु होता. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि आपल्या संघाचं कौतुक करताना माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचं नाव न घेता टोला लगावला आहे.

“आमच्या संघात कोणीही देव नाही, किंवा सिनीअर-ज्युनिअर असलाही प्रकार नाही. कोणत्याही देशात गेला तरी हा संघ विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलो, प्रत्येक सामन्यात याच निर्धाराने तो मैदानात उतरतो. याच कारणासाठी माझ्या संघाचा मला अभिमान वाटतो. भारतीय संघाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा संघ आता पूर्वीच्या संघातील कोणत्याही खेळाडूच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो हे छातीठोकपणे सांगू शकतो.” शास्त्री पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

शास्त्री म्हणाले की, “हा निकाल माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. माझ्यासाठी 1983 चा वर्ल्ड कप आणि 1985 ची वर्ल्ड चॅम्पियनशीप यापेक्षाही हा मालिका विजय मोठा आहे. हे कसोटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खरा कस या प्रकारात लागतो.” 1990 ते 2000 या कालावधीत भारतीय संघात तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आदी दिग्गज खेळाडू होते. मात्र, या दिग्गजांना ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.