इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या संघात युवा डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात दिनेश कार्तिकचाही समावेश असल्यामुळे ऋषभ पंत याला अंतिम संघात स्थान मिळणार का, हे पाहणे महत्वाचे आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमार याच्या कमरेला दुखापत झाली होती. त्याच्या प्रकृतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. कसोटी संघातील त्याच्या समावेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे BCCIने सांगितले.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करूण नायर दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर

१८ खेळाडूंच्या या संघातून अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा याला वगळण्यात आले आहे. कसोटीतील त्याची कारकीर्द तितकीशी प्रभावी नसल्याने त्याच्या जागी करूण नायर याला पसंती देण्यात आली आहे. तसेच, मराठमोळ्या शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तसेच, चायनामॅन कुलदीप यादव यालाही समाविष्ट करण्यात आले आहे.

या संघात जसप्रीत बुमरा यालाही समाविष्ट करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेतून माघार घेतल्यानंतर जसप्रीत बुमरा पहिल्या ३ कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यादरम्यान बुमराच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यावेळी बुमराच्या अनुपस्थितीत कुलदीप यादवने भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली होती.