अ‍ॅथलेटिक्स हा सर्वाधिक पदके मिळवून देणारा क्रीडा प्रकार. पण सध्या मुंबईचे अ‍ॅथलेटिक्समधील अस्तित्व हे मुंबई मॅरेथॉनपुरतेच उरलेले आहे. एके काळी देशाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक दिग्गज धावपटू देणाऱ्या मुंबईची अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पीछेहाट होऊ लागली आहे. ७० ते ८०च्या दशकात राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व ७० ते ८० टक्के असायचे. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे १० टक्केच खेळाडू अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली असूऩ, आता मुंबईतील खेळाडूंना प्रशिक्षण आणि सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण फक्त ट्रॅक तयार करून चालणार नाही तर खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षण आणि आधुनिक सोयीसुविधा पुरवण्याची गरज आहे, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’ या चर्चासत्रात मान्यवरांनी मांडले.

करोडो रुपये खर्च करून पुण्यातील बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम बांधण्यात आले. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धानंतर ही स्टेडियम आता ओस पडली आहेत. या स्टेडियममध्ये खेळाडूंना सराव करण्याची संधीच मिळत नाही. या दोन्ही स्टेडियम्समध्ये सराव करण्यासाठी एका दिवसाला लाखो रुपये मोजावे लागतात. आता दक्षिण मुंबईत विद्यापीठ क्रीडा संकुलात अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक बनवण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील ट्रॅक फक्त नावापुरतेच उरले होते. प्रियदर्शिनीचा ट्रॅक आता संपण्याच्या मार्गावर आहे. लहान वयातील खेळाडू हेच अ‍ॅथलेटिक्समधील भवितव्य. पण ही मुले प्रवास करून शाळेत जाणार की कांदिवलीच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्रॅकवर जाऊन सराव करणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक आता युवा खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. खेळाडूंसाठी समिती स्थापन करून त्यात अर्जुन पुरस्कार विजेते आणि माजी ऑलिम्पिक खेळाडूंचा समावेश करायला हवा.
आदिल सुमारीवाला
माजी ऑलिम्पियन वभारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष

मुंबई ही देशाची अ‍ॅथलेटिक्समधील पंढरी होती. मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर सराव करून अनेक दिग्गज खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. एडवर्ड सिक्वेरा, आदिल सुमारीवाला, होमिया मेस्त्री, अ‍ॅलेक्स सिक्वेरा अशी अनेक नावे घेता येतील. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत खेळाडू घडवण्याचे प्रमाण घटले असले तरी त्याबाबतीत मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न सुरूच आहेत. आता मुंबई विद्यापीठाच्या मरिन लाइन्स येथील क्रीडा संकुलात नवा कोरा अ‍ॅथलेटिक ट्रॅक तयार करून आम्ही युवा खेळाडूंच्या सरावाची उत्तम सोय केली आहे. या ट्रॅकवर सराव करून मुंबई विद्यापीठाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडतील, अशी आशा आहे. विद्यापीठाच्या ट्रॅकवर सराव करण्यासाठी अ‍ॅथलीट्सना नाममात्र शुल्क भरून अव्वल दर्जाचा सराव आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून आम्ही समिती स्थापन करणार आहोत, तसेच भविष्यासाठी धोरणही ठरवणार आहोत.
डॉ. उत्तम केंद्रे
मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक

मी मुंबईची असले तरी माझा सराव बंगळुरूत सुरू असतो. मी फार मोजक्या वेळा आणि मुंबई मॅरेथॉन शर्यतीसाठी मुंबईत येत असते. पण मुंबईत आल्यावर रस्त्यांवर धावून आपली कारकीर्द घडवणारे अनेक खेळाडू मी पाहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक बसवण्यात आल्याने त्याचा फायदा सर्वानाच होणार आहे. रस्त्यांवर धावताना खेळाडूंना अनेक वेळा दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची कारकीर्द बहरण्याआधीच संपुष्टात येण्याचा धोका अधिक असतो. सिंथेटिक ट्रॅकवर सराव केल्याचा फायदा युवा खेळाडूंना शर्यतीदरम्यान होऊ शकतो. पण फक्त सरावाची सोय उपलब्ध करून चालणार नाही. तर खेळाडूंना प्रशिक्षण आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यायला हवे. खेळाडूंचा सर्वात जास्त खर्च हा त्यांच्या खाण्या-पिण्यावर आणि शूजवर होत असतो. या सुविधा पुरवण्यात आल्या तर मुंबईतूनही अव्वल दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतील.
ललिता बाबर
आंतरराष्ट्रीय धावपटू