विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघ लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने असा टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात मोठा मुक्काम असणार आहे. कर्णधार विराट कोहली मात्र पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर माघारी परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत उप-कर्णधार अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येईल असा अंदाज सध्या वर्तवला जातोय. परंतू विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आव्हानात्मक असेल असं मत हरभजन सिंहने व्यक्त केलंय.

“अजिंक्यसाठी ही मालिका आव्हानात्मक असेल. कारण याआधी त्याने कधीच प्रदीर्घ काळासाठी भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं नाही. तो खूप शांत असतो, फारसा व्यक्त होत नाही. विराटपेक्षा त्याची शैली खूप वेगळी आहे. त्याच्यासाठीदेखील हा एक वेगळा अनुभव असणार आहे. मला आशा आहे की हे आव्हान तो सहज पूर्ण करेल आणि संघाचं यशस्वीपणे नेतृत्व करेल.” हरभजन Sports Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितने कंबर कसली, NCA मध्ये सरावाला सुरुवात

मात्र संघाचं नेतृत्व करत असताना अजिंक्यला आपल्या शैलीत बदल करण्याची गरज नसल्याचंही हरभजन म्हणाला. आपल्या नेहमीच्या शैलीतही अजिंक्य संघाकडून उत्तम कामगिरी करवून घेऊ शकतो, असं हरभजन म्हणाला.