इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन-डे सामन्यात, इयॉन मॉर्गनच्या इंग्लंड संघांने सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समाचार घेत इंग्लंडने ४८१ धावांपर्यंत मजल मारत, ऑस्ट्रेलियाला ४८२ धावांचं आव्हान दिलं. अॅलेक्स हेल्स आणि जॉनी बेरअस्ट्रो यांच्या आक्रमक शतकी खेळीच्या आधारावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला. याव्यतिरीक्त जेसन रॉय आणि कर्णधार इयॉन मॉर्गननेही अर्धशतकी खेळी करुन संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.

इंग्लंडने दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३७ षटकांमध्ये २३९ धावा करुन माघारी परतला. इंग्लंडने २४२ धावांनी मोठा विजय संपादन करत ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. दरम्यान कालच्या सामन्यात तब्बल १२ विक्रमांची नोंदही झाली.

३ – इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान ३ शतकी भागीदाऱ्या रचल्या गेल्या. (जेसन रॉय-जॉनी बेअरस्ट्रो), (ज़ॉनी बेअरस्ट्रो-अॅलेक्स हेल्स), (अॅलेक्स हेल्स-इयॉन मॉर्गन). वन-डे क्रिकेट इतिहासातली ही तिसरी संयुक्त भागीदारी ठरली आहे.

५ – ट्रेंट ब्रिजच्या मैदानाने आतापर्यंत अ श्रेणी क्रिकेटमध्ये ५ वेळा ४०० पेक्षा जास्त धावा अनुभवल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जोहान्सबर्गचं वाँडर्स हे मैदान असून या मैदानावर आतापर्यंत ४ वेळा ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या गेल्या आहेत.

६ – जॉनी बेअरस्ट्रोने १०० च्या स्ट्राईक रेटने वन-डे क्रिकेटमध्ये ६ शतकं ठोकली आहेत. या यादीमध्ये बेअरस्ट्रो शाहिद आफ्रिदीसमावेत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत एबी डिव्हीलियर्स २५ शतकांसह तर ऐजाझ अहमद १० शतकांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.

२१ – इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यात तब्बल २१ षटकार ठोकले. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडने आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

४१ – इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समाचार घेत कालच्या सामन्यात तब्बल ४१ चौकार लगावले. वन-डे क्रिकेट इतिहासात एका डावात इंग्लंडने मारलेले हे चौकार तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा श्रीलंकेच्या संघाच्या नावावर आहे, श्रीलंकेच्या संघाने एका डावात ५६ चौकार लगावले आहेत.

१०० – ९ षटक टाकून एकही विकेट न घेता ऑस्ट्रेलियाच्या अँड्रू टायने कालच्या सामन्यात १०० धावा मोजल्या. वन-डे क्रिकेट इतिहासात एका गोलंदाजाने एका डावात सर्वात जास्त धावा दिलेली ही अकरावी (संयुक्तरित्या) वेळ ठरली आहे.

१०७ – इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान एकूण १०७ चेंडूंवर धावा काढल्या गेल्या नाहीत.

२९० – चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून इंग्लंडने तब्बल २९० धावा केल्या. वन-डे इतिहासातली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली भारताविरुद्ध मुंबई येथे खेळवण्यात आलेल्या वन-डे सामन्यात, चौकार आणि षटकारांच्या मदतीने २७१ धावा काढल्या होत्या. (३८ चौकार, २० षटकार)

३३४ – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने याआधी ३३४ धावांचं लक्ष्य सहज गाठलं आहे. आतापर्यंत कांगारुंनी दुसऱ्यांचा फलंदाजी करताना केवळ दोन वेळा ४०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पल्ला गाठला आहे.

४८१ – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

४९६ – इंग्लंडव्यतिरीक्त सरे क्रिकेट क्लबने अ श्रेणी क्रिकेटमध्ये ४९६ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे.

५४४३ – इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने ५४४३ धावा काढल्या आहेत. मॉर्गनने इयान बेलला (५४१६ धावा) मागे टाकलं आहे.