आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रायन लारासाठी आजचा दिवस हा अधिक महत्वाचा आहे. २००४ साली आजच्याच दिवशी ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. सेंट जोन्स येथील कसोटी सामन्यात लाराने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना हा विक्रम रचला होता, आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाराचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही. या खेळीदरम्यान लाराने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनचा ३८० धावांचा विक्रम मोडला होता.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने गमावल्यामुळे विंडीजचा संघ आणि ब्रायन लाराच्या कर्णधारपदावर शंका घेतल्या जात होत्या. अखेरच्या कसोटीत लाराने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. विंडीजने आपला पहिला डाव, ५ बाद ७५१ धावांवर घोषित केला होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला २८५ धावांत बाद करण्यात विंडीज गोलंदाजांना यश आलं आणि इंग्लंडवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. अखेरचा सामना विंडीज जिंकणार असं वाटत असतानाच, इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने दुसऱ्या डावात १४० धावांची खेळी करत इंग्लंडचा डाव सांभाळला. अखेरीस ५ बाद ४२२ धावांवर दुसार डाव घोषित करण्यात आला आणि सामना अनिर्णित राहिल्याची घोषणा करण्यात आली.

लाराने या मॅरेथॉन खेळीत ७७८ चेंडूंचा सामना करताना ४३ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या कसोटीत लारा नाबाद राहिला. त्याला यष्टीरक्षक रिडली जेकब्जने नाबाद १०७ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी २६९ धावांची भागीदारी केली. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात धावांचे डोंगर रचले जातात, त्यामुळे लाराचा हा विक्रम भविष्यात कोण मोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.