टीम इंडिया आपल्या नव्या कसोटी कर्णधारासह आगामी बांगलादेश दौऱयासाठी रवाना होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून भरपूर क्रिकेट खेळल्यामुळे आराम घेण्यासाठी बांगलादेश दौऱयातून आपल्याला वगळण्यात यावे अशी विनंती विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे(बीसीसीआय) केल्याचे समजते. सोबत टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे टीम इंडियाचा बांगलादेश दौरा पूर्णकाळ प्रशिक्षकाशिवाय होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात १० जूनपासून भारतीय संघ बांगलादेश दौऱयावर जाणार असून यामध्ये एक कसोटी, तीन एकदिवसीय सामने रंगणार आहेत.
मागील वर्षी मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती स्विकारल्यानंतर युवा फलंदाज विराट कोहलीच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कसोटी संघाची धुरा सोपविण्यात आली. मात्र, आयपीएल संपल्यानंतर काही काळ आरामाची गरज असल्याची इच्छा कोहलीने बीसीसआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना वगळता ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेलेल्या भारतीय संघाचे व्यवस्थापकीय मंडळ बांग्लादेश दौऱासाठी देखील कायम राहणार असल्याचे समजते. यामध्ये रवि शास्त्री संघाचे संचालक राहतील तर संजय बांगर, भरत अरुण आणि आर.श्रीधर सहप्रशिक्षक म्हणून कायम असणार आहेत.