पात्रता फेरीचा अडसर ओलांडून मुख्य स्पध्रेत दाखल होणाऱ्या अमेरिकेच्या टिम स्मायझेकने बुधवारी सर्वाचे लक्ष वेधले. कारण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या स्पेनच्या राफेल नदाल याला विजयासाठी स्मायझेकने चक्क पाच सेट झुंजायला लावले. १४ ग्रँड स्लॅम जिंकण्याची किमया साधणाऱ्या नदाल याला तब्बल चार तास आणि १२ मिनिटे चाललेल्या लढतीनंतर तिसरी फेरी गाठण्यात यश मिळाले. याचप्रमाणे टेनिसजगतातील शहेनशाह रॉजर फेडररने पहिला सेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये खळबळजनक निकालाची नोंद होणार, याबद्दल सर्वाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, परंतु अनुभवी फेडररने पुढील दोन सेट जिंकत दिमाखदारपणे तिसरी फेरी गाठण्याची किमया साधली आहे. याशिवाय मारिया शारापोव्हा, अँडी मरे आणि ग्रिगोर दिमित्रोव्ह यांनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे.
गेले काही महिने तंदुरुस्तीबाबत झगडणाऱ्या नदालला स्मिझेकविरुद्ध सर्वस्व पणाला लावावे लागले. अतिशय चुरशीने झालेला हा सामना त्याने ६-२, ३-६, ६-७ (२-७), ६-३, ७-५ असा जिंकला. साडेचार तास चाललेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी सव्‍‌र्हिस व परतीचे फटके याचा बहारदार खेळ केला. पहिल्या सेटपासून होणाऱ्या पोटाच्या दुखापतीवर मात करून नदाल या लढतीत खेळला. त्यामुळे तिसऱ्या सेटमध्ये ट्रेनर आणि डॉक्टरला मैदानावर पाचारण करावे लागले होते. त्याने वेदनाशामक गोळ्या घेऊन ही लढत पूर्ण केली.
फेडररने पहिला सेट गमावल्यावर बहारदार खेळ करत इटलीच्या सिमोनी बोलेल्लीवर ३-६, ६-३, ६-२, ६-२ अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये त्याला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. दुसऱ्या सेटपासून त्याने खेळावर नियंत्रण मिळवत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत तीन वेळा विजेतेपदाच्या उंबरठय़ावरून परतलेल्या मरे याला दुसऱ्या फेरीत मरिन्को मातोसेविक याच्याविरुद्ध विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. हा सामना त्याने ६-१, ६-३, ६-२ असा एकतर्फी जिंकला. दिमित्रोव्हने लुकास लॅकोचे आव्हान ६-३, ६-७ (१०-१२), ६-३, ६-३ असे संपुष्टात आणले.
महिलांमध्ये शारापोव्हा हिला आपलीच सहकारी अ‍ॅलेक्झांड्रा पॅनोवा हिच्याविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. हा सामना तिने ६-१, ४-६, ७-५ असा जिंकला. निर्णायक सेटमध्ये या दोन्ही रशियन खेळाडूंनी चिवट खेळ केला. अखेर शारापोव्हा हिने अनुभवाचा फायदा घेत विजय मिळवला. रशियाच्याच एकतेरिना माकारोवा हिने तुलनेत सहज विजय मिळवला. तिने इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सी हिला ६-२, ६-४ असे हरवत तिसरी फेरी गाठली. १४व्या मानांकित सारा इराणी हिने आपले आव्हान टिकवताना स्पेनच्या सिल्विया एस्पीनोसा हिला
७-६ (७-३), ६-३
असे हरवले.
सानिया व पेसची आगेकूच
भारताच्या सानिया मिर्झा हिने महिलांच्या दुहेरीत तर लिएण्डर पेसने पुरुष दुहेरीत आगेकूच केली. सानियाने चीन तैपेईच्या सुवेई हिसेह हिच्या साथीत मारिया इरीगोयेन व रोमिना ओपरान्डी यांचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. हा सामना त्यांनी ४८ मिनिटांमध्ये जिंकला. पेसने दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेनच्या साथीने स्कॉट लिपस्की व राजीव राम यांना ६-४, ७-६ (८-६) असे हरवले.

माझ्यासाठी हा सामना अतिशय खडतर ठरला. प्रतिस्पर्धी टिम स्मायझेकच्या खेळाचे मी सर्वप्रथम कौतुक करतो. पाचव्या सेटमध्ये त्याने दिलेली झुंज लाजवाब होती.
-राफेल नदाल