भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांच्या वाढत्या प्रमाणाला पाठिंबा दिला आहे. ट्वेन्टी-२० सामन्यानुसार फटकेबाजी करण्यासाठी आपण स्वत:च्या फलंदाजीत आवश्यक बदल केले असते, असे गांगुली म्हणाला.

भारताचा कसोटी सलामीवीर मयांक अगरवालसह केलेल्या ऑनलाइन संवादादरम्यान गांगुलीने ट्वेन्टी-२० सामन्यांविषयीचे मत मांडले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट ही काळाची गरज आहे. जर माझ्या कारकीर्दीच्या वेळी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांचे सातत्याने आयोजन झाले असते, तर मीसुद्धा आवश्यकतेनुसार फलंदाजीत बदल केले असते. ट्वेन्टी-२०मुळे फलंदाजांकडून विविध फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळते,’’ असे ४७ वर्षीय गांगुली म्हणाला.

गांगुलीने ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना त्याला खेळता आला नाही. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाच हंगामांमध्ये गांगुलीने ट्वेन्टी-२० सामन्यांचा आनंद लुटला.

‘‘मला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळायला नक्कीच आवडले असते. ट्वेन्टी-२० सामन्यांमुळे तुम्हाला युवा खेळाडूंच्या विचारसरणीचा अंदाज येतो. ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्स तसेच पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करताना मी खेळाडू तसेच कर्णधार या नात्याने ट्वेन्टी-२० सामन्यांचा आनंद लुटला,’’ असेही गांगुलीने सांगितले. त्याशिवाय २०१९च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंपैकी तीन जणांची २००३च्या विश्वचषकासाठी निवड करायची असल्यास तू कोणाची निवड करशील असे विचारले असता गांगुलीने विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांची नावे घेतली.

गांगुली एटीके-मोहन बागानचा संचालक

कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीची इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल संघ एटीके- मोहन बागानमध्ये संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ‘‘गांगुली आता सहमालकांपैकी एक आहे. तो संघाचा संचालक बनण्यासाठी १०० टक्के दावेदार आहे. १० जुलैला आमची बैठक होत असून त्यात संघाचे नाव, जर्सी आणि लोगो निश्चित होईल,’’ असे एटीके- मोहन बागान संघाचे आणखी एक संचालक उत्सव पारेख यांनी सांगितले.