24 February 2021

News Flash

यू मुंबाने नाकारल्याचे अनुप कुमारला शल्य

कठीण परिस्थितीत शांतपणे निर्णय घेणाऱ्या अनुपकडे सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाचा चषक अनावरण कार्यक्रम शुक्रवारी चेन्नईत सुनील कुमार (गुजरात फॉच्र्युनजायंटस), जोगिंदरसिंग नरवाल (दबंग दिल्ली), धरमराज चेरलाथन (यु मुंबा), सुरजित सिंग (बंगाल वॉरियर्स), प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स), अजय ठाकूर (तामिळ थलायव्हास), रिशांक देवाडिगा (यूपी योद्धा), विशाल भारद्वाज (तेलुगू टायटन्स), रोहित कुमार (बेंगळूरु बुल्स), अनुप कुमार (जयपूर पिंक पँथर्स) आणि गिरीश ईर्नाक (पुणेरी पलटण) या कर्णधारांच्या उपस्थित पार पडला.

|| प्रशांत केणी

कठीण परिस्थितीत शांतपणे निर्णय घेणाऱ्या अनुपकडे सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व

प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर आतापर्यंतच्या पाचही हंगामांमध्ये अनुप कुमारने यू मुंबाचे यशस्वी नेतृत्व केले होते. त्यामुळेच कठीण परिस्थितीत शांतपणे निर्णय घेणाऱ्या अनुपचे या संघाशी जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व करणाऱ्या अनुपला यू मुंबाने नाकारल्याचे शल्य लपवता आले नाही.

चेन्नईत शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या चषकाचे यंदाच्या हंगामातील कर्णधारांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अनुप म्हणाला की, ‘‘यू मुंबाचे यंदाच्या हंगामात आणि पुढील काही हंगामांमध्ये प्रतिनिधित्व करावे, अशी माझी इच्छा होती. अन्य कोणत्याही संघाकडून खेळायची माझी इच्छा नव्हती. पण तसे घडले नाही. संघात कायम न ठेवणे आणि नंतर लिलावातसुद्धा कार्ड वापरून संघात न घेण्याचा निर्णय सर्वस्वी यू मुंबा प्रशासनाचा होता.’’

यू मुंबा तुला संघात स्थान देणार नाही, याची माहिती होती का, या प्रश्नाला उत्तर देताना अनुप म्हणाला, ‘‘लिलावाआधी मला त्याची पूर्वकल्पना होती. परंतु तरीही आशा होती. ३० लाख ही फारशी मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे यू मुंबा मला संघात ठेवतील, असे वाटत होते. पण त्यांनी विचारपूर्वकच हा निर्णय घेतला असावा. कदाचित त्यांना माझी कामगिरी योग्य वाटली नसावी. लिलावात माझ्याबाबत कोणत्याही संघाने उत्सुकता दर्शवली नाही. फक्त अभिषेक बच्चन यांनी माझ्यावर विश्वास प्रकट केल्यामुळे जयपूरने मला संघात स्थान दिले.’’

यू मुंबाशी सामना खेळताना तू कोणत्या दृष्टिकोनातून पाहशील, याबाबत अनुप म्हणाला, ‘‘यू मुंबाशी सामना खेळताना भावनिक आव्हानसुद्धा माझ्यासमोर असेल. कारण मागील पाचही हंगाम मी या संघाकडून खेळलो आहे.

मात्र मैदानावर या गोष्टींना महत्त्व नसते. मी जयपूरसाठी खेळताना त्यांच्याच विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे. मात्र यू मुंबाचा संघ जयपूरशिवाय अन्य कोणत्याही संघाशी खेळेल, तेव्हा मुंबईचाच संघ जिंकावा, अशी माझी भावना असेल.’’

एशियाडमधील पराभव जिव्हारी!

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव हा माझ्यासह देशातील सर्व कबड्डीरसिकांच्या जिव्हारी लागला आहे. परंतु याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहायचे तर इराण आणि कोरियाची उंचावणारी कामगिरी, ही कबड्डीसाठी चांगली आहे. आणखी काही देशांपर्यंत खेळ पोहोचला की तो अधिक विकसित होईल. लवकरच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत कबड्डी पोहोचावा, हीच इच्छा आहे,’’ अशी प्रतिक्रिया अनुपने व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, ‘‘भारताचा पराभव व्हावा, असे कधीच वाटत नाही. त्यामुळे त्याचे अतिशय दु:ख झाले. कर्णधार अजय ठाकूरशी माझे ऋणानुबंधाचे नाते आहे. त्यामुळे पराभवानंतर कर्णधार आणि त्याच्या निर्णयाबाबत टीका झाली, तेव्हा फार वाईट वाटले.’’

नवे खेळाडू दडपण बाळगतात!

‘‘मी, राकेश कुमार, नवीन कुमार यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना कोणत्याही स्पर्धामध्ये खेळवले, तरी आमच्या कामगिरीत कोणताही फरक पडत नाही. कामगिरीतील सातत्य कायम राहते. मात्र नवे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दडपण बाळगतात. त्यामुळे त्यांची कामगिरी शंभर टक्के उंचावत नाही. प्रो कबड्डी लीगमध्ये खेळताना हे दडपण नसते. कारण एखादा सामना गमावला तरी आणखी बरेच सामने खेळायचे असतात,’’ असे मत खेळाडूंच्या कामगिरीमधील फरकाबाबत अनुपने व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:06 am

Web Title: u mumba anup kumar
Just Now!
X