अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत यंदाच्या उपांत्य सामन्यात राफेल नदाल विरुद्ध रॉजर फेडरर हा सामना होण्याची शक्यता आता संपलेली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला अर्जेंटीनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रोकडून पराभव स्विकारावा लागला. ७-५, ३-६, ७-६ (१०-८), ६-४ अशा फरकाने डेल पोट्रोने रॉजरचा पराभव केला. या सामन्यात रॉजर फेडरर हा मानसिक आणि शाररिकदृष्ट्या खचलेला पहायला मिळाला. तरीही रॉजरने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र डेल पोट्रोच्या झंजावातापुढे त्याला आपला पराभव मान्य करावाच लागला.

या हंगामाच्या सुरुवातीपासून रॉजर फेडरर हा पाठदुखीमुळे त्रस्त होता. मात्र तरीही त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र अमेरिकन ओपन स्पर्धेतला आपला खेळ पाहता, उपांत्य फेरीत आपल्याला नदालला हरवण जमलं नसतं असं रॉजर फेडररचं म्हणणं आहे. उपांत्य फेरीत नदालशी होऊ शकत असलेल्या सामन्याविषयी विचारलं असता फेडरर म्हणाला, “मी त्या गोष्टीचा अजिबात विचार करत नव्हतो. ज्या क्षणी मी सामना हरलो तिकडे सगळ्या गोष्टी संपल्या. सध्या मी सामन्यात कुठे चुकलो यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय, आणि आगामी काळात त्यावर अधिक काम करुन मला मैदानात उतरायचं आहे.”

उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडावं लागणं हे नक्कीच दुर्दैवी आहे. पण काही गोष्टी तुम्हाला मान्य करुन चालावं लागतं. आजच्या सामन्यात डेल पोट्रोचा खेळ माझ्यापेक्षा सरस होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयाचा दावेदार हा तोच होता. मी ज्या पद्धतीने खेळ केला तो पाहता मला उपांत्य फेरीत जागा मिळणं अशक्य होतं, माझ्यापेक्षा डेल पोट्रो नदालला चांगलं हरवु शकतो असंही फेडररने म्हणलं आहे.

या पराभवातून एक गोष्ट चांगली झाली असेल ती म्हणजे मला आरामासाठी वेळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी ज्या पद्धतीने सामने खेळत होतो, त्यामुळे मला थकवा आलाच होता. त्यामुळे पुढचा काही काळ मी मैदानापासून दूर राहून केवळ आराम करणार आहे, फेडरर आपल्या पराभवानंतर पत्रकारांशी बोलत होता.  त्यामुळे आता अमेरिकन ओपन स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.