महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर निवृत्त झाले, सचिन तेंडुलकर निवृत्त झाला, परंतु मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष अद्याप पॅड बांधून उभे आहेत. हे निवृत्त व्हायला तयारच नाहीत आणि यांच्या नावावर शून्य धावा जमा आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) मावळते अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.
‘क्रिकेट फर्स्ट’ पॅनेलच्या प्रचारासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणासह मतदारांना आवाहन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘राजकारण आणि खेळ वेगळे ठेवा, असा आम्हाला सल्ला दिला जातो. पण हेच राजकारणी खेळाचा खेळखंडोबा करीत आहेत.’’
‘‘मुंबईतील खेळाडूंचा एके काळी रूबाब होता. हा रणजी संघ अख्खा भारतासाठी खेळू शकेल, इतका बलवान होता. ते सामने तिकीट काढून पाहायला जाण्यात वेगळी मजा असायची. कांगा क्रिकेट स्पध्रेचे सामनेसुद्धा मी भिजत पाहायचो. परंतु आताचे मुंबईचे क्रिकेट पाहून आपण क्रिकेट वाढवतोय की कमी करतोय,’’ असा सवाल यावेळी उद्धव यांनी उपस्थित केला. ‘‘शिवसेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसते आहे, असे प्रतिस्पर्धी पॅनेलच्या एका उमेदवाराने म्हटले होते. तुम्ही कुणासोबत बसला आहात, याचा विचार केला आहे का,’’ असा टोला यावेळी उद्धव यांनी हाणला.
‘‘ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. परंतु या ठिकाणी बरेच वष्रे रणजी सामनेच झालेले नाहीत. शिवसेनेमुळे ठाण्यात एमसीएला दर्जेदार सुविधा पुरवणाऱ्या वास्तूच्या बांधणीसाठी जागा मिळाली नाही, असा दावा केला जात आहे. एमसीएचा बाजार मांडून जी दुकाने थाटली जात आहेत, त्या दुकानदारीला माझा विरोध आहे,’’ असे उद्धव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘काही मंडळींनी जागा दिसेल तिथे इमारती बांधल्या. परंतु जिथे जागा दिसेल तिथे मैदाने बांधण्याचा आणि योग्य प्राथमिक सुविधा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. मुंबईतील क्रिकेट क्लबना स्वत:च्या खेळपट्टय़ा मिळवून देण्यासाठी आम्ही बांधील राहू.’’
‘‘आझाद मैदानात प्राथमिक सुविधांची वानवा आहे आणि आपण अनेक सचिन घडवायला निघालो आहोत. जोवर धावा न करणारे व्यक्ती मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदावर विराजमान असतील, तोवर हे असेच घडणार. मुंबई क्रिकेटचे भवितव्य ठरवणारे भाग्यविधाते आहोत. हे सारे बंद करा,’’ असे भावनिक आवाहन उद्धव यांनी मतदारांना केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आव्हान देणारे ‘क्रिकेट फर्स्ट’चे उमेदवार विजय पाटील म्हणाले, ‘‘पवारांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना वागणूक दिली जाते, ती पाहून पवारांचा लोकशाहीवर विश्वास आहे का, हा प्रश्न पडतो. मी वरिष्ठ उपाध्यक्ष असताना मला जी वागणूक दिली गेली, ती दु:खद होती. मला कार्यकारिणी सभेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली गेली नाही.’’
‘‘मुंबईकडे दुसऱ्या फळीचा अभाव आहे. आता गुणवान खेळाडू आपल्याला शोधायला लागत आहेत,’’ असे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांनी सांगितले.