16 December 2017

News Flash

मुंबई मॅरेथॉनमध्ये युगांडाचा झेंडा

* किपरॉप, किपकेटर यांनी रचले नवे स्पर्धाविक्रम * भारतीयांमध्ये बिनिंग लिनखोई, ललिता बाबर विजेती * महिलांमध्ये

तुषार वैती, मुंबई | Updated: January 21, 2013 4:25 AM

युगांडात असलेली तणावग्रस्त परिस्थिती आणि क्रीडासंस्कृतीचा अभाव यामुळे जॅक्सन किपरॉपने बाजूच्या इथिओपिया देशात जाऊन जेकब चेशारी याच्याकडून धावण्याचे धडे गिरवले. पण पदार्पणाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये किपरॉपने चेशारी याचेच आव्हान मोडीत काढून जेतेपदाला गवसणी घातली. या वेळी पहिल्यांदाच मुंबई मॅरेथॉनवर युगांडाचा झेंडा फडकला. किपरॉप आणि केनियाची व्हॅलेन्टिन किपकेटर यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात नव्या स्पर्धाविक्रमाची नोंद केली.
दोन दिवसांपासून मुंबईत असलेल्या थंडीमुळे मुंबई मॅरेथॉनमध्ये नव्या विक्रमाची नोंद होणार, अशीच चर्चा होती. पण दमदार अ‍ॅथलीट्सच्या अनुपस्थितीत धावणारे केनिया, इथिओपियाचे अ‍ॅथलीट ३५ किलोमीटपर्यंत बरेच मागे पडले होते. पण त्यानंतर किपरॉपने वेग वाढवत २ तास ०९ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ देत २०११मध्ये गिरमा असेफा (२ तास ०९ मिनिटे ५४ सेकंद) याने रचलेला विक्रम मागे टाकून नव्या विक्रमाची नोंद केली. महिलांमध्ये किपकेटर हिने इथिओपियाच्या स्पर्धकांचे कडवे आव्हान सहजपणे मोडून काढले. तिने २ तास २४ मिनिटे ३३ सेकंद अशी वेळ नोंदवून नेत्सानेत अचामो हिने गेल्या वर्षी रचलेला २ तास २६ मिनिटे १२ सेकंदाचा विक्रम सहज मागे टाकला. स्पर्धाविक्रम रचल्यामुळे किपरॉप आणि किपकेटर यांनी १५ हजार अमेरिकन डॉलरच्या बोनस रकमेसह एकूण ५५ हजार अमेरिकन डॉलरची लयलूट केली.
गतवर्षीचा विजेता लेबान मोईबेन, हेन्ड्रिक रामाला, अब्राहम गिरमा, विल्यम किपलगट आणि इलिजाह केम्बोई या स्टार अ‍ॅथलीट्सनी चांगली सुरुवात केली. हाजीअलीपर्यंत हे सर्वच जण एकत्र धावत होते. पण वांद्रे-वरळी सागरी सेतूवर मोईबेन, सिबुसिसो झिमा आणि मुलुइ अन्डोन्म या धावपटूंनी आघाडी घेतली. पण परतीच्या प्रवासात पेडर रोडपर्यंत अन्डोम, किपरॉप, गिरमा, चेशारी आणि मायकेल मुटाय हे आघाडीवर होते. पण अचानक किपरॉपने चौथा गिअर टाकत या सर्वाना २०० मीटरने मागे टाकले. ३८ किलोमीटरच्या अंतरावर चेशारी आणि किपरॉप यांच्यात अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस रंगली. पाणी घेण्यासाठी चेशारीने वेग कमी केला आणि याचा फायदा उठवत किपरॉपने आपला वेग कायम ठेवत चेशारीला बरेच मागे टाकले. अखेर हीच आघाडी कायम ठेवत किपरॉपने जेतेपदावर मोहोर उमटवली.
भारतीयांमध्ये सेनादलाच्या बिनिंग लिनखोईने बाजी मारली. गेल्या वर्षीचा विजेता आणि सहकारी रामसिंग यादवच्या अनुपस्थितीत धावणाऱ्या लिनखोईला सर्वोत्तम कामगिरी करता आली नसली तरी त्याने आशिष सिंग आणि इलाम सिंग यांच्यावर मात करून जेतेपदावर नाव कोरले. मेघालयाच्या लिनखोईने २ तास २१ मिनिटे ५१ सेकंद अशी वेळ देत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. आशिष सिंग याने २ तास २३ मिनिटे ०५ सेकंदासह दुसऱ्या स्थानावर मजल मारली. भारतीय अ‍ॅथलीट्समध्ये जेतेपदासाठी दावेदार समजला जाणारा इलाम हा ३० किलोमीटपर्यंत अव्वल क्रमांकावर होता. पण शरीराने साथ न दिल्यामुळे त्याला २ तास २३ मिनिटे ०९ सेकंदासह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये, महाराष्ट्राच्या कन्या अव्वल तीन जणींमध्ये आल्या. साताऱ्याच्या ललिता बाबर हिने अव्वल क्रमांकाचा मुकुट पटकावत गतविजेतेपद कायम राखले. तिने रेल्वेची विजयमाला पाटील आणि पदार्पण करणारी रोहिणी राऊत यांच्यावर मात करत २ तास ५३ मिनिटे ४२ सेकंद अशी कामगिरी नोंदवली. मुंबईची विजयमाला २ तास ५७ मिनिटे ४२ सेकंदासह दुसरी तर नागपूरची रोहिणी ३ तास ०३ मिनिटे २१ सेकंदासह तिसरी आली.
अर्धमॅरेथॉन शर्यतीत भारतीय धावपटूंनीच अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. पुरुषांमध्ये नितेंदर सिंगने १ तास ०६ मिनिटे १६ सेकंद अशी वेळ देत अव्वल स्थानी झेप घेतली तर सचिन पाटील (१.०९.०१ सेकंद) आणि अतवा भजत (१.०९.३२ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. तापामुळे कविता राऊत हिने माघार घेतल्याने आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंग हिने १ तास १७ मिनिटे २४ सेकंद महिला गटात बाजी मारली. रितू पाल सिंग (१.१९.१९ सेकंद) आणि मोनिका अथरे (१.१९.२८) यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.
बॉलीवूड अभिनेत्यांची ‘दांडी’
मुंबई मॅरेथॉन आणि बॉलीवूड हे समीकरण बनले आहे. एखाद्या संस्थेसाठी किंवा सामाजिक उद्दिष्ट गाठण्यासाठी दिग्गज बॉलीवूम्ड अभिनेते मुंबई मॅरेथॉनला आवर्जून हजेरी लावतात. पण या वेळी दिया मिर्झा, जॉन अब्राहम, दिनो मोरिया, राहुल बोस या दरवर्षी सहभागी होणाऱ्या कलावंतांसह फार कुणी मॅरेथॉनसाठी फिरकलेच नाहीत. अश्मित पटेल, तारा शर्मा, अभिजित सावंत, शर्मन जोशी, विवेक ओबेरॉय, गुलशन ग्रोवर, कल्की कोएल्चिन हे अभिनेते मात्र स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘ड्रीमरन’मध्ये सहभागी झाले होते.
माझ्या यशात आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्सचा मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी मी ही शर्यत कमी वेळात पूर्ण केली होती. या वेळी हा विक्रम मोडण्याच्या तयारीने आलो होतो, मात्र तसे होऊ शकले नाही. अव्वल स्थान पटकावले आहे याचे समाधान आहे मात्र अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करता आली नाही याचे दु:ख आहे. –
लिंगखोई बिनिंग,पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय धावपटूंमध्ये अव्वल
      गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉन ज्या वेळेत पूर्ण केली त्यापेक्षा यंदा अधिक वेळ लागला. वातावरण चांगले होते, सरावही उत्तम झाला होता. मात्र गेल्या वर्षीची वेळ ओलांडता आली नाही याचे शल्य आहे. मात्र आजची कामगिरी समाधानकारक आहे. छोटय़ा गावात खेळ, प्रशिक्षण, सराव याबद्दल माहिती नसते. पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर धावपटूंना मोठा फायदा होईल.
ललिता बाबर, भारतीय महिला धावपटूंमध्ये अव्वल
     चांगला धावपटू होण्यासाठी सकस आहार, पादत्राणे यांची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी नियमित प्रायोजकत्व मिळाल्यास पुढचा प्रवास सुकर होईल. आज विजयी झालेल्या तिघी जणी ग्रामीण भागातून आलो आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर गुणवत्ता आहे, मात्र या गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळायला हवी.
 विजय माला पाटील, भारतीय महिला धावपटूंमध्ये दुसरे स्थान
मुंबई मॅरेथॉनचे निकाल
पूर्ण मॅरेथॉन : पुरुष (एलिट)- १) जॅक्सन किपरॉप (२ तास ०९ मिनिटे ३२ सेकंद, युगांडा), २) जेकब चेशारी (२.०९.४३, इथिओपिया), ३) इलिजाह केम्बोई (२.१०.०३, केनिया).
महिला- १) व्हॅलेन्टिन किपकेटर (२.२४.३३, केनिया), २) डिन्कनेश मेकाश (२.२८.४६, इथिओपिया), ३) अबेरू मेकूरिया (२.२९.०३, इथिओपिया).
पूर्ण मॅरेथॉन- भारतीय पुरुष- १) बिनिंग लिनखोई (२.२१.५१ सेकंद), २) आशिष सिंग (२.२३.०५ सेकंद), ३) इलाम सिंग (२.२३.०९ सेकंद)
भारतीय महिला- १) ललिता बाबर (२.५३.४२ सेकंद), २) विजयमाला पाटील (२.५७.४२ सेकंद), ३) रोहिणी राऊत (३.०३.२१ सेकंद).
अर्ध मॅरेथॉन- पुरुष गट- १) नितेंदर सिंग (१.०६.१६ सेकंद), सचिन पाटील (१.०९.०१ सेकंद), ३) अतवा भजत (१.०९.३२ सेकंद).
महिला गट- १) सुधा सिंग (१.१७.२४ सेकंद), २) रितू पाल (१.१९.१९ सेकंद), ३) मोनिका अथरे (१.१९.१९ सेकंद).

First Published on January 21, 2013 4:25 am

Web Title: uganda flag in mumbai marathon