भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्यांना ट्विटरवर मराठीत दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरल्या आहेत. तर सेहवागने त्यांना दबंग फलंदाज संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित सोशल मीडियावर विविध आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

या विविध आठवणींमध्ये एक विशेष आठवण म्हणजे पंचांनी एकदा भर मैदानात सुनील गावस्कर यांचे केस कापल्याची घटना घडली होती. पूर्वीचे खेळाडू सुरुवातीच्या काळात फलंदाजी करत असताना हेल्मेट घालत नव्हते. काही काळाने भारतीय फलंदाजांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली. पण गावस्कर यांनी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या महाकाय वाटणाऱ्या गोलंदाजीच्या आक्रमणाला विनाहेल्मेट तोंड दिले होते आणि त्यांची फलंदाजी चोपून काढली होती.

मात्र १९७४ साली ओल्ड ट्रॅफर्डमध्ये सुनील गावस्कर फलंदाजी करत असताना पंचांनी थेट कात्रीने त्यांचे केस कापून टाकले होते. त्यावेळी फलंदाजी करत असताना वाढलेले केस गावस्कर यांच्या डोळ्यापुढे येत होते. त्यामुळे त्याला फलंदाजी करण्यास अडचण होत होती. अखेर गावस्कर यांनी पंच डिकी बर्ड यांना ते केस कापून टाकण्याची विनंती केली. त्याकाळी चेंडूची शिवण कापण्यासाठी पंचांजवळ कात्री असायची. गावस्कर यांची फलंदाजीत येणारी अडचण लक्षात घेत बर्ड यांनी त्या कात्रीने त्यांचे डोळ्यापुढे येणारे केस कापले होते. त्यावेळी ‘पंचांना काय करावे लागेल, हे सांगता येत नाही’, असे पंच बर्ड म्हणाले असल्याचेही गावस्कर यांनी नंतर सांगितले होते.