क्रीडाविषयक अर्थसंकल्पात २५८ कोटी रुपयांनी वाढ

केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयाकरिता २५८ कोटी २० लाख रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सांगितले. या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ) दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे.

जेटली यांनी क्रीडा मंत्रालयासाठी मागील वर्षीच्या १९३८.१६ कोटींच्या तुलनेत एकूण २१९६ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षांत ‘साइ’ला ४९५ कोटी ७३ लाख रुपये देण्यात आले होते; परंतु आगामी वर्षांकरिता ६६.१७ कोटी रुपयांनी कपात करून ४२९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या प्रकल्पासाठी सर्वात जास्त निधीचे नियोजन करण्यात आले आहे. चालू वर्षांसाठी ३५० कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र पुढील वर्षीसाठी ५२० कोटी ९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील क्रीडाविषयक सुविधांसाठी मागील आर्थिक वर्षांत ७५ कोटींची तरतूद करण्यात आली होती, हा आकडा आता ५० कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे. आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धासाठी खेळाडूंना अर्थसंकल्पात कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. मात्र राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या निधीत ४० कोटींनी वाढ करण्यात आली आहे. या संघटनांसाठी आधी ३०२.१८ कोटी देण्यात येत होते. मात्र आता हा निधी ३४२ कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे.राष्ट्रीय क्रीडा विकास निधी दोन कोटी रुपये कायम ठेवण्यात आला आहे, तर जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेसाठीचे (वाडा) योगदान एक कोटी रुपये कायम असेल. २०१८-१९ या वर्षांसाठी खेळाडूंच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. १८.१३ कोटी रुपयांवरून ही वाढ  आता २३ कोटी रुपये आहे.