भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारी इंदूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. या मालिकेतला दुसरा सामना हा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर संघटनेत अनेक बदल होताना दिसत आहेत. काही वर्षांपासून दिवस-रात्र कसोटी सामन्यांना नकार देणाऱ्या बीसीसीआयने अखेरीस यासाठी पुढाकार घेतला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल.

या कसोटी सामन्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा या ऐतिहासिक कसोटी सामन्याला हजेरी लावणार आहेत. याचसोबत बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या सामन्याला हजेरी लावणार आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मेरी कोम, अभिनव बिंद्रा यांसारख्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा यादरम्यान सत्कार करण्यात येणार आहे.

याचसोबत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही या सोहळ्यात आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनीने समालोचन करावं यासाठी Star Sports ही सामन्याचं प्रक्षेपण करणारी वाहिनी प्रयत्नशील होती, मात्र बीसीसीआयने याला नकार दिला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्यामुळे इडन गार्डन्स परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात येणार आहे.