नवी दिल्ली : क्रिकेट कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर अव्यावसायिक पद्धतीने हाताळण्यात आले, असा आरोप भारताचा माजी सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला आहे. युवराजने गेल्या वर्षी जूनमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याविषयी बोलताना युवराज म्हणाला की, ‘‘क्रिकेट कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर मला व्यावसायिक क्रिकेटपटूप्रमाणे वागणूक देण्यात आली नाही. मात्र माझ्याआधी हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांनादेखील त्यांच्या अखेरच्या टप्प्यावर योग्य प्रकारे सहकार्य देण्यात आले नाही. भारतीय क्रिकेटची तशीच परंपरा असावी असे वाटते. त्यामुळे मला फारसे वेगळे वाटले नाही. मात्र भविष्यकाळात जे क्रिकेटपटू अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील त्यांचा योग्य सन्मान करण्यात यावा,’’ असे युवराजने सांगितले.