किंग्स्टन येथे झालेल्या जमैकन आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पध्रेत भारताचा थाळीफेकपटू विकास गौडाने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ६५.१४ मीटर लांब थाळी फेकून ही सुवर्ण कामगिरी केली. जमैकाचा चॅड राइट (६१.८४ मी.) आणि अमेरिकेच्या जॅरेड शुमान्स (६१.६२ मी.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.
राष्ट्रकुल स्पध्रेतील विजेता आणि २०१४च्या आशियाई स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या गौडाने गेल्या तीन आठवडय़ांत तीन वेळा ६५ मीटरहून लांब थाळी फेकण्याचा विक्रम केला आहे.
राष्ट्रीय विक्रम (६६.२८ मी.) नावावर असलेल्या गौडाने २४ एप्रिलला चुला विस्ता येथे ६५.२५ मीटर लांब थाळी फेकून ऑगस्टमध्ये होणाऱ्या बीजिंगमधील विश्वअजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्रता मिळवली होती. त्याआधी सॅन डिएगो येथे त्याने ६५.७५ मीटर लांब थाळी फेकली होती.