भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेषत: आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं या पत्रात म्हटलं आहे. आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली पत्रात म्हणतो…

या पत्रामध्ये विराट कोहलीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट म्हणतो, “फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला सुदैवी समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो”.

विराट पत्रात पुढे म्हणतो, “आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळं काही संघाला दिलं आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.”

सगळ्यांशी चर्चा करूनच निर्णय

दरम्यान, सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं विराट सांगतो. “अर्थात, या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन”, असं विराटनं या पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहली कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. त्याच्या जागी रोहित शर्मा कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवणार असल्याचं देखील सांगितलं जत होतं. मात्र, या सर्व चर्चा बीसीसीआयकडून फेटाळण्यात आल्या होत्या. अखेर आज खुद्द विराटनंच आपण टी-२० संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli announces to step down as t 20 captain of indian cricket team after world cup pmw
First published on: 16-09-2021 at 18:08 IST