टीम इंडियाचा उद्यापासून विंडीज दौरा सुरु होणार आहे. टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली. याशिवाय रोहित आणि विराट यांच्यातील गटबाजी आणि वादाचे वृत्तदेखील विराटने फेटाळून लावले. पण आज विराटने पोस्ट केलेल्या फोटोमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विराट कोहलीने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला त्याने माझा संघ असे कॅप्शन दिले. या फोटोत विराटसह रवींद्र जाडेजा, नवदीप सैनी, खलील अहमद, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि लोकेश कुमार हे सर्व खेळाडू आहेत.

या फोटोमध्ये उपकर्णधार रोहित शर्मा मात्र दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांनी विराटवर प्रश्नांचा भडीमार केला.