भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजवर मालिकेला सुरुवात होण्याआधीच दुःखाचा डोंगर कोसळला. हैदराबादमध्ये सिराजच्या वडिलांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आपल्या मुलाला भारतीय संघाकडून खेळताना पाहण्याची सिराजच्या वडीलांची इच्छा होती. या मोठ्या धक्क्यानंतरही सिराजने भारतात न परतता ऑस्ट्रेलियात संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीने यादरम्यान दिलेला धीर आपल्याला खूप कामी आल्याचं सिराजने bcct.tv शी बोलताना सांगितलं.

“मियाँ टेन्शन मत ले…तू भारताकडून खेळावंस असं तुझ्या बाबांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याच्यावर लक्ष दे…ताण घेऊ नकोस. या परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकलास तर तुलाच पुढे याचा फायदा होईल.” विराटच्या या शब्दांनी आपल्याला धीर मिळाल्याचं सिराजने सांगितलं. IPL मध्येही सिराज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB संघाकडून खेळला होता.

सिराजने वडिल मोहम्मद घौस हे फुफ्फुसांच्या आजारामुळे त्रस्त होते. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. वडिलांच्या निधनानंतर बीसीसीआयने सिराजला भारतात परतण्याची मूभा दिली होती, परंतू सिराजने भारतीय संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.