पाच वेळा जगज्जेता ठरलेला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याच्यावरील चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुक्रवारी ५१वा वाढदिवस साजरा करतानाच आनंदने चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मुंबईस्थित सुंदियाल एंटरटेनमेंट कंपनीच्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली.

‘तनू वेड्स मनू’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे तसेच ‘मुक्काबाज’ या खेळाशी निगडित चित्रपटाची निर्मिती करणारे आनंद एल. राय यांच्याकडे आनंदवरील चरित्रपटाची मुख्य सूत्रे आहेत. या चरित्रपटासाठी याआधीही अनेक जणांनी आनंदकडे प्रस्ताव ठेवले होते, पण आनंदने अखेर हा प्रस्ताव स्वीकारला. या चित्रपटातील अभिनेत्यांची निवड करण्यात आली नसली तरी पुढील वर्षी सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आनंदने आपल्या आक्रमक खेळाने ९०च्या दशकात बुद्धिबळातील युरोपीय देशांचे वर्चस्व मोडीत काढले. भारताचा पहिला ग्रँडमास्टर ते जगज्जेतेपदापर्यंतचा प्रवास, जगज्जेतेपदासाठीच्या थरारक लढती तसेच बुद्धिबळातील राजकारण हे या चित्रपटातील मुख्य मुद्दे असतील.