२६ फेब्रुवारीला बालाकोट या ठिकाणी भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानने बुधवारी सकाळी केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांना खाली पाडले. यानंतर त्यांचे मिग-२१ विमान शत्रूने पाडले. त्यानंतर ते पाकिस्तानात आहेत. पण ‘शांततेचा संकेत’ म्हणून अभिनंदन यांची आज सुटका करण्यात येईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी संसदेत जाहीर केले. यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याच्या स्वागताची वाट पाहणारे ट्विट आणि संदेश पाहायला मिळत आहेत.

भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेदेखील अभिनंदन यांच्या स्वागतासाठी एक खास भावनिक संदेश ट्विट केला आहे. आम्ही आमच्या धाडसी भारतीय व्यक्तीचे भारतात स्वागत करण्यासाठी आतुरतेने वाट पहात आहोत, असे धवनने ट्विट केले आहे.

या आधी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हादेखील धवनने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक कविता पोस्ट केली होती. व्हिडिओपोस्ट सह त्याने प्रेरणादायी संदेश ट्विट केला होता.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश जारी केला होता. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते की तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार. अभिनंदन सुखरुप घरी परत यावा, यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असतील याची खात्री आहे.