चॅम्पियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीचे वेध जसे लागायला लागले आहेत, तशी स्पर्धेतील रंगत आणखीनच वाढली आहे. साखळीतील दोन सामन्यांपैकी एकामध्ये विजय आणि एका पराभवानिशी वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अखेरचा साखळी सामना रंगणार असून जो संघ हा सामना जिंकेल त्यालाच उपांत्य फेरीचे दररवाजे उघडणार आहेत.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी भारताविरुद्धच्या लढती गमावल्या असल्या तरी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवलेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे पुनरागमन होत असून त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब असेल. गेल्या सामन्यातील रयान मॅकलारेनचा अपवाद वगळता त्यांच्या गोलंदाजांना अजूनपर्यंत स्पर्धेत छाप पाडता आलेली नाही. फलंदाजीमध्ये सलामीवीर हशिम अमला चांगल्या फॉर्मात असला तरी अन्य फलंदाजांना फॉर्मशी झगडावे लागत आहे.
वेस्ट इंडिजच्या संघात दादा खेळाडू असले तरी त्यांना आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांना अजूनही छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात डॅरेन ब्राव्हो आणि डॅरेन सॅमी यांनी अर्धशतके लगावली असून त्यांच्याकडून आता आशा वाढलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये सुनील नरिन हा त्यांचा हुकमी एक्का आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, फरहान बेहरदीन, जीन-पॉल डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, कॉलिन इनग्राम, रयान मॅकलारेन, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, अल्विरो पीटरसेन, रॉबिन पीटरसन, आरोन फांगिसो, डेल स्टेन, लोनवाबो त्सोत्सोबे.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), दिनेश रामदिन, टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड, रवी रामपॉल, केमार रोच, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स, रामनरेश सरवान, डेव्हॉन स्मिथ.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स-२.