News Flash

पारदर्शक कारभारावर भर देणार -शिर्के

शिर्के यांचा मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) माहिती न मिळाल्यामुळे व गैरसमजुतीमुळे प्रसार माध्यमांकडून मंडळावर विनाकारण टीका होत असते. हे कटू प्रसंग टाळण्यावर व पारदर्शी कारभारावर भर दिला जाणार आहे, असे बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले.

शिर्के यांचा मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर व एमसीएच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे उपस्थित होते.

‘‘प्रसार माध्यमांना पाहिजे असलेली माहिती न मिळाल्यामुळे आजपर्यंत बीसीसीआयला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. अन्य क्रीडा संघटनांच्या तुलनेत बीसीसीआयचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केल्यास ही संस्था अव्वल मूल्यांकन असलेलीच संघटना आहे. आम्ही दर वर्षी प्राप्तिकर भरतो, सामाजिक बांधिलकी जपत असतो. कोणतीही संस्था किंवा व्यक्तीचे एकाही पैशाचे देणे लागत नाही,’’ असे शिर्के यांनी सांगितले. रणजीचे सामने आता त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत विचारले असता शिर्के म्हणाले, ‘‘रणजी स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळली जावी, हा त्यामागचा हेतू आहे. या सामन्यांकरिता खेळपट्टी कशी ठेवावी याबाबत मंडळातर्फे सर्व संलग्न संघटनांना मार्गदर्शक तत्त्वे पाठवली जाणार आहेत. खेळकर खेळपट्टी ठेवण्यावर भर दिला जाईल. खेळपट्टी बनविण्यावर मंडळाचे नियंत्रण राहणार आहे.’’

‘‘कसोटी सामन्यांबाबत लोकप्रियता वाढविण्यासाठी यंदाच्या मोसमात भारतात १३ कसोटी सामने आयोजित केले जाणार आहेत. ऑक्टोबर २०१६ ते मे २०१७ या कालावधीत हे सामने होतील. एक दोन कसोटी सामने दिवसरात्र स्वरूपाचे असतील. पाकिस्तानबरोबर सामने आयोजित करण्याचे अधिकार सर्वस्वी केंद्र शासनाकडे असल्यामुळे आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही,’’ असे शिर्के यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:22 am

Web Title: will focus on transparency work says mca president ajay shirke
Next Stories
1 भारतीय महिला हॉकी संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का
2 अॅलिस्टर कुकने तोडला सचिनचा रेकॉर्ड
3 कोहली नेतृत्व करण्यास योग्य; धोनीने खेळाचा आनंद लुटावा – रवी शास्त्री
Just Now!
X