चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी२० स्पर्धेद्वारा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करीन असा आत्मविश्वास भारताचा द्रुतगती गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केला. स्नायूंच्या दुखण्यामुळे तो सध्या आजारी आहे.
चॅम्पियन्स लीग स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार आहे व त्यामध्ये मुंबई इंडियन्सकडून मी निश्चित खेळणार आहे असे सांगून झहीर म्हणाला, २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. विश्वचषक स्पर्धा हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते व या स्पर्धेत पुन्हा भारताकडून खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. अर्थात या स्पर्धेसाठी भरपूर अवधी आहे. तोपर्यंत माझी तंदुरुस्ती व गोलंदाजीतील कामगिरी कशी राहते यावरच माझे स्थान अवलंबून असणार आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धा ही माझ्या कामगिरीची पहिली कसोटी असेल.
माझ्या डाव्या पायावर मी सध्या उपचार घेत आहे. हे दुखणे थोडेसे किचकट असून त्यामधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. मी सध्या तंदुरुस्ती व शारीरिक क्षमतावाढीवर भर देत आहे. मी एक महिन्यानंतर पुन्हा नेटमध्ये सरावास प्रारंभ करीन. स्नायूंचे दुखणे सुरू झाल्यानंतर मी एकदाही गोलंदाजी केलेली नाही. इंग्लंडच्या दौऱ्यावर मी जाऊ शकत नाही याचे दु:ख मला निश्चित होत आहे. इंग्लंडमध्ये माझे सहकारी चांगले यश मिळवतील असेही झहीर याने सांगितले.