व्यावसायिक गोल्फपटूंच्या संघटनेतर्फे (पीजीए) आयोजित होणाऱ्या गोल्फ स्पर्धा आता विख्यात गोल्फपटू टायगर वुड्सविनाच खेळवाव्या लागणार आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या अपघातामुळे वुड्सच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्या असून त्याचे स्पर्धात्मक पुनरागमन आता कठीण मानले जात आहे.

४५ वर्षीय वुड्सवर बुधवारी १०वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या गंभीर अपघातातून वुड्स बचावल्याने गोल्फविश्वाला दिलासा मिळाला. ‘‘जेव्हा वुड्सला गोल्फविषयी चर्चा करायची इच्छा होईल, त्या वेळी आम्ही त्याच्याशी चर्चा करू. गंभीर अपघातावर मात करून वुड्स परतल्यानंतर आम्ही त्याचे स्वागतच करू,’’ असे जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान स्पर्धा आयुक्त जय मोनाहन यांनी सांगितले.

‘‘या अपघातानंतर व्यावसायिक गोल्फपटू म्हणून पुनरागमन करणे अशक्य आहे, असे मला खेदाने सांगावे लागेल. त्याचे वय, पाठीच्या असंख्य दुखापती यामुळे व्यावसायिक गोल्फपटू म्हणून तंदुरुस्त होण्यासाठी वुड्सला बराच वेळ लागेल,’’ असे स्टॅनफोर्ड वैद्यकीय केंद्रातील डॉ. मायकेल गार्डनर यांनी सांगितले.