चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने विजयी सलामी दिली आहे. सायनाने आपल्या पहिल्या सामन्यात तुर्कीच्या अली डेमीबर्गचा २१-१७, २१-८ अशा दोन सरळ सेट्समध्ये पराभव केला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सायनाला प्रतिस्पर्धी अली डेमीर्बगकडून चांगलाच प्रतिकार सहन करावा लागला. पहिल्या सेटमध्ये अलीने सायनाला चांगलचं दमवलं. पहिल्या काही मिनीटांमध्ये अलीने सायनावर १-२ गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत अलीने ११-१० अशी नाममात्र आघाडी कायम ठेवली. मात्र मध्यांतराआधी सूर हरवलेल्या सायनाने आपल्या खेळात बदल केला. आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सायनाने अलीवर कुरघोडी करायला सुरुवात केली. ड्रॉप आणि स्मॅशच्या फटक्यांचा सुरेख वापर करत सायनाने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करत आघाडी घेतली. अलीने सायनाशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सायनाने वेळेतच २१-१७ च्या फरकाने पहिला सेट आपल्या नावावर करत सामन्यामध्ये आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासूनच सायनाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. तिच्या या चालीपुढे अली पुरती भांबावून घेतली. दोन्ही खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली रंगताना दिसल्या. मात्र सायनाने चतुराईने काही गुणांची कमाई करत ४-५ गुणांची भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली. नेटजवळचे काही फटके खेळत सायनाने तुर्कीच्या अलीला चांगलचं दमवलं. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने ११-४ अशी भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली होती.