फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील पहिला सामना सोमवारी बरोबरीत सुटला. ‘फ’ गटातील नायजेरिया आणि इराण यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. यंदाच्या विश्वचषक स्पध्रेतील आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यांमध्ये गोलचा वर्षांव आणि आक्रमक खेळ पाहायला मिळत आहे. एरिना डा बायझाडा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील पहिल्या सत्रावर नायजेरियाचे वर्चस्व जाणवले, मात्र गोल साकारण्यात मात्र त्यांना यश आले नाही. दुसऱ्या सत्रातही त्यांना मिळालेल्या संधीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही.
पहिल्या सत्रात नायजेरियाचे आक्रमणवीर इमान्युएल इमेनिके आणि व्हिक्टर मोझेस यांनी डावीकडून जोरदार आक्रमण केले. त्यावेळी इराणच्या बचाव फळीने समर्थ खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला नायजेरियाला यश मिळणार होते, परंतु अहमद मुसाचा गोल अयोग्य ठरवण्यात आला. सामना जसा
पुढे जात होता, तसा इराणचा खेळ अधिक आत्मविश्वासपूर्ण जाणवत होता. ३४व्या मिनिटाला रेझा घुचानेझाडने मारलेला लाजवाब हेडर नायजेरियाचा गोलरक्षक व्हिन्सेंट इनीमाने रोखला.