भारताचा सलामीवीर डावखुरा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने दमदार शतक ठोकले होते, पण दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत BCCI कडून माहिती देण्यात आली. धवन दुखापतीतून किती दिवसात तंदुरुस्त होणार याबाबत BCCI कडून निश्चित सांगण्यात आलेले नाही. पण लढाऊवृत्ती असलेला शिखर धवन दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला आहे.

शिखर धवन हा दुखापतीमुळे हार मानणारा खेळाडू नाही. धवन अत्यंत लढाऊ आहे. आताच्या घडीला त्याची दुखापत पाहता त्याला संघात खेळवू नये. पण तो त्याच्या दुखापतीतून लवकरात लवकर सावरेल आणि दमदार पुनरागमन करेल याची मला खात्री आहे, असे सचिनने इंडिया टुडे वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिन बोटाला दुखापत झालेली असतानाही खेळला होता. जर संघाला गरज भासली, तर शिखर धवन देखील तशा पद्धतीचा खेळ करू शकतो, असेही सचिन म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.

सचिनने भारत आणि पाकिस्तानच्या संघांबद्दलही आपले मत व्यक्त केले. “गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण .. तीनही आघाड्यांवर भारतीय संघ चांगला आहे. भारतीय संघ जेव्हा उत्तम लयीत असतो तेव्हा त्यांना पराभूत करणे अत्यंत कठीण असते. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघ उत्तम लयीत असेल असा मला विश्वास आहे.”, असे सचिन म्हणाला.

पाकिस्तानच्या संघाबाबत बोलताना सचिन म्हणाला की मी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहिला. या सामन्यात मला पाकिस्तानच्या खेळातील एक बाब प्रकर्षाने जाणवली. फलंदाजी करताना त्यांच्यात भागीदारी होते, पण नेमके महत्वाच्या वेळीच ते गडी गमावतात. त्यामुळे प्रत्येक सामन्यात खेळताना पक्षितांच्या डोक्यात ही गोष्ट नक्की असणार की सामना चांगला सुरु असला, तरी आपल्याला गडी बाद होऊ द्यायचे नाहीत आणि या गोष्टीचे कुठेतरी दडपण पाकिस्तानवर दिसून येऊ शकते. भारतीय संघ मात्र मोक्याच्या क्षणी गडी गमावण्याची चूक करण्याची शक्यता खूपच कमी आहे. हाच दोन संघांमधील फरक आहे. भारत आणि पाकिस्तान हा सामना १६ जूनला होणार आहे.